Electricity: मुंबई आणि उपनगराचा २,२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित; संध्याकाळी ५ वाजता दिवे लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 03:00 AM2020-10-13T03:00:28+5:302020-10-13T03:01:15+5:30

कळवा-पडघा केंद्रातील बिघाडाचा फटका : वीजपुरवठा सुरळीत होण्यास वाजले सायंकाळचे पाच

Electricity: 2,200 MW power outage in Mumbai and suburbs; The lights went on at 5 in the evening | Electricity: मुंबई आणि उपनगराचा २,२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित; संध्याकाळी ५ वाजता दिवे लागले

Electricity: मुंबई आणि उपनगराचा २,२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित; संध्याकाळी ५ वाजता दिवे लागले

googlenewsNext

मुंबई : महापारेषणच्या कळवा-पडघा केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, कल्याण, पालघर, नवी मुंबईचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यास दुपारचे दोनएक वाजले; तर काही ठिकाणी तब्बल सायंकाळचे पाच वाजले. यामुळे मुंबई आणि उपनगराचा सुमारे २ हजार २०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला होता. ऊर्जा विभागाच्या म्हणण्यानुसार, कॅसकॅडिंग इफेक्टमुळे मुंबई शहरासह उपनगराचा वीजपुरवठा खंडित झाला असून, खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापारेषणचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत होते.

अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यात मोबाइल चार्ज नसल्याने सकाळीच कामे थांबली. बॅटरी बॅकअपवर दुपारपर्यंत कशी तरी कामे खेचतादेखील आली. मात्र दुपारी बारानंतर विजेवर चालणारी सगळीच उपकरणे ठप्प पडली होती. लॅपटॉप, मोबाइल चालेनासा झाल्याने मुंबईकरांची चलबिचल वाढली. अस्वस्थता वाढली. त्यात दुपारी बहुतांश मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क बंद पडले. तसेच अनेक ठिकाणी बॅटरी बॅकअप संपल्याने एटीएम सेंटरही बंद पडली होती.

राज्याच्या साहाय्यासाठी केंद्राचे पथक येणार
मुंबईत झालेल्या बत्ती गुलचा अभ्यास करण्यासाठी तसेच राज्य सरकारला अशा परिस्थितील उपाययोजनांमध्ये सहकार्य देण्यासाठी राष्ट्रीय वीज प्राधिकरणाच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत येणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. राज्याच्या ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असल्याचे केंद्रीय मंत्री सिंह यांनी सांगितले.

अदानी, टाटा, महावितरणसह बेस्टचे वीजग्राहक ‘गॅस’वर
1) कळवा येथील उपकेंद्रात झालेल्या बिघाडाचा फटका अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरणसारख्या चारही मोठ्या वीज कंपन्यांना बसला. त्यातल्या त्यात अदानी वीज कंपनीने आपल्या डहाणू येथील वीज केंद्रातून साडेतीनशे मेगावॅट वीज पर्यायी यंत्रणेवरून वाहून आणली. परिणामी, मुंबईकरांना काही अंशी का होईना दिलासा दिला. मात्र टाटा, बेस्ट व महावितरणच्या वीजग्राहकांना दिवसभर उकाड्यात बसावे लागले.

2) मुंबई आणि आसपासच्या महानगरात सोमवारी सकाळी १० वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळचे ५ वाजले तरी सुरळीत झाला नव्हता. दुपारी २ वाजता अदानीच्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा काही काळ सुरळीत झाला होता. मात्र पुन्हा ३ वाजता खंडित झालेल्या वीजपुरठ्याने वीजग्राहकांना अंधारात टाकले. सोमवारी सकाळी १० वाजता वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुढील दीडएक तासात वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा चारही वीज कंपन्यांनी केला.

3) दुपारी १२ वाजता बेस्टचे वीजग्राहक वगळता उर्वरित वीज कंपन्यांच्या ग्राहकांना ताटकळत राहावे लागले. बेस्टचा मात्र ९० टक्के परिसरात वीजपुरवठा सुरळीत झाला होता. टाटा आणि अदानीच्या वीजग्राहकांना तर दुपारचे १२ वाजले तरी त्रासाबद्दल क्षमस्व आणि वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे, एवढेच संदेश पाठविले जात होते. मुंबई शहरात दुपारी १२ वाजता काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. तर दुपारी दोनच्या दरम्यान पश्चिम उपनगरात बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. मात्र पूर्व उपनगरात दुपारचे साडेचार वाजले तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

विद्यापीठ विभागाच्या परीक्षा सुरळीत : काही काळासाठी खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालयातील काही समूह महाविद्यालयांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या तर काही समूह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. कला, वाणिज्य आणि विज्ञान समूह महाविद्यालयांच्या एकूण ४२ समूहांपैकी ३२ समूहांमध्ये परीक्षा सुरळीत पार पडल्या. यामध्ये १९,२७९ पैकी १८,९५० विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या परीक्षा दिली. विद्यापीठाच्या ३२ क्लस्टरमधील ५ क्लस्टर्सच्या अंशत: काही महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत तर १० समूह महाविद्यालयांनी त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये केसी महाविद्यालयाचा समावेश असून त्यांच्या सोमवारी नियोजित परीक्षा आता रविवारी होणार आहेत. सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या सकाळच्या सत्रातील परीक्षा या सुरळीत पार पडल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी दिली.

सायन रुग्णालयात १६ शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या : सायन रुग्णालयात सहा शस्त्रक्रिया नियोजित होत्या. त्यातील चार पुढे ढकलल्या. न्यूरो विभागातील दोन सर्जरी पुढे ढकलल्या. नेत्र विभागात ५ पैकी २ सर्जरी पुढे ढकलल्या तसेच युरॉलॉजी विभागातील आठ नियोजित सर्जरींपैकी दोन पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. तर जे.जे. रुग्णालयात मुख्य बाह्यरुग्ण विभाग, क्षकिरण विभाग, सीटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी विभागात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. मात्र काही काळात जनरेटर सज्ज केल्याने या सेवा पूर्ववत करण्यात आल्याचे जे.जे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले. वरळीच्या एनएससीआय कोविड केंद्रात खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम झालेला दिसून आला. येथील २४ तास सुरू असणारी वातानुकूलित यंत्रणा बंद झाली होती. त्यामुळे काही काळ रुग्णांना बाहेर येऊन बसावे लागले.
 

Web Title: Electricity: 2,200 MW power outage in Mumbai and suburbs; The lights went on at 5 in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज