स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला आज मिळली वीज!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 02:05 PM2019-06-30T14:05:19+5:302019-06-30T14:08:47+5:30
स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्यातील 80 घरात आज अखेर वीज आली आहे. विजेचा प्रकाश पडल्यावर येथील आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - देशातील सर्व घरात वीज मिळणार असा ठाम दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्याची प्रचिती आज गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुर्तगती महामार्गालगत असलेल्या नवसाचा पाड्यात आली. स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्यातील 80 घरात आज अखेर वीज आली आहे. विजेचा प्रकाश पडल्यावर येथील आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरीतील गोरेगाव पूर्व येथील नवसाचा पाडा या आदिवासी पाड्यांत वीज नव्हती. वीज नसल्याने येथील आदिवासी बांधव गेली 100 वर्षे अंधारात आपले जीवन जगत होते. स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाडा अंधारात असल्याचे वृत्त लोकमतने सातत्याने दिले होते.
स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला अखेर वीज मिळाली आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकाऱ्यांनी नवसाच्या पाड्याला काही दिवसांपूर्वी विद्युत व जलजोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यावेळी येथील 80 आदिवासी बांधवांनी बँड वाजून जल्लोष केला होता. वीज मीटर जोडणी आणि वायरींचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले होते आणि आज खऱ्या अर्थाने नवसाचा पाडा हा विद्युत दिव्यांनी उजळून गेला.
लोकमतच्या वृत्ताची दखल अखेर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाला घ्यावी लागली अशी माहिती नवसाचा आदिवासी पाड्याला वीज व पाणी जोडणी मिळावी म्हणून आदिवासींसाठी काम करणाऱ्या नाझरेथ फाउंडेशन या अशासकीय सेवाभावी संस्थेच्या कसान्ड्रा नाझरेथ यांनी दिली. आदिवासी पाड्यांना वीज मिळावी म्हणून या संस्थेने सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेला सोशल मीडियावर नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अखेर येथील आदिवासी बांधवाना वीज मिळण्यासाठी कसान्ड्रा नाझरेथ यांनी लढा दिला परिणामी आमच्या घरात आज वीज आली अशी माहिती येथील आदिवासी बांधवांनी दिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला 72 वर्षे झाल्यानंतर देखील आमचा नवसाचा पाडा अंधारात होता. मुंबई व्हेटरनरी कॉलेजसाठी नवसाचा पाडा येथील जागा दिली, मात्र आजमितीस आम्हाला त्यांना वीज मिळाली नाही. या कॉलेजच्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट आहेत पण आमच्या नवसाचा पाडा येथील आदिवासीच्या घरात वीज नव्हती. आज आदिवासी बांधवांच्या घरात वीज आल्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला असून आमच्यासाठी वीज आल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीच आहे अशी बोलकी प्रतिक्रिया येथील राकेश शिगवण व लखमा दिवाल उंबरसाडे यांनी दिली.
गेल्या 28 मे रोजी आदिवासी हक्क संवर्धन समिती, मुंबई यांनी येथील आदिवासींना वीज जोडणी व अन्य सुविधा मिळाव्यात म्हणून येथील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून ते मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयापर्यंत आरेच्या 27 आदिवासीपाड्यातील आदिवासीं बांधवांनी धडक मोर्चा काढला होता. जर दोन दिवसात येथील वीजेच्या प्रश्नांबाबत ठोस निर्णय मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने घेतला नाही, तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा समितीने दिला होता. याची अखेर त्यांनी दखल घेऊन वीज व जलजोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र नवसाच्या पाड्याला दिले आणि आमचा आदिवासी पाडा दिव्यांनी उजळला अशी माहिती समितीचे अध्यक्ष दिनेश हाबळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.