Join us

मंडळांना घरगुती दराने वीज, अर्ज करताच ४८ तासांच्या आत होणार वीजपुरवठा सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 1:09 PM

मंडळांनी गैरमार्गाने विजेचा पुरवठा घेण्यापेक्षा रीतसर अर्ज करून वीजपुरवठा घ्यावा, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.

मुंबई : गणेशोत्सवानंतर आता मुंबापुरीला नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. दुर्गोत्सव साजऱ्या करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना वीज कंपन्यांकडून घरगुती दराने विजेचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे मंडळांनी गैरमार्गाने विजेचा पुरवठा घेण्यापेक्षा रीतसर अर्ज करून वीजपुरवठा घ्यावा, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.

अनेक वेळा मंडळांकडून गैरमार्गाने वीज घेतली जाते. अशावेळी यंत्रणेवर लोड येऊन दुर्घटनेची शक्यता असते. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासह उत्सव उत्साहात साजरा व्हावा म्हणून मंडळांनी अधिकृतरीत्या विजेचा पुरवठा घ्यावा, असे वीज कंपन्यांनी म्हटले आहे.

तुम्ही आधी हे करा...- केवळ अधिकृत व्यक्तींनाच मीटर केबिनमध्ये प्रवेशाची परवानगी द्या. वीजजोडणीसाठी मानक असलेल्याच वायर व स्विचचा वापरा करा.- कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सिंगल आयसोलेशन पॉइंट असायला ठेवा.- देऊ केलेल्या मंजूर भारापेक्षा अधिक वीजभार नसावा.- बॅकअपसाठी जनरेटर वापरत असल्यास जनरेटर यंत्र व न्यूट्रल यांचे योग्यरीत्या अर्थिंग करा.- वीजजोडणी विस्तारासाठी तीन पिन प्लग वापरा.- अग्निशामक यंत्र हे मीटर केबिनजवळ ठेवावे.- मीटर केबिनमध्ये योग्य अर्थिंग ठेवा.

गेल्या वर्षी ५६८ हून अधिक नवरात्र मंडपांना वीजपुरवठा केला होता. दुर्गापूजा मंडळांकडून अर्ज प्राप्त होण्याच्या ४८ तासांत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे अदानी इलेक्ट्रिसिटीकडून सांगण्यात आले. 

नवरात्र तसेच दुर्गापूजा मंडळे वीजजोडणीसाठी आवश्यक अर्ज सादर करण्याकरिता www.ada-ielectricity.com या संकतेस्थळाला किंवा अन्य साहाय्यासाठी अदानीच्या नजीकच्या कार्यालयाला भेट देऊ शकतात.

दुर्गापूजा मंडपाला भेट देणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी अधिकृत परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडूनच वीजजोडणीचे काम करून घ्यावे.

टॅग्स :नवरात्रीवीज