मुंबई : कोरोना महामारी आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेले व दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणारे राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करणेत यावीत व या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने कोविड पॅकेज वा अनुदान स्वरूपात करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी सोमवार, १३ जुलै रोजी सकाळी १२ वाजता घरगुती वीज बिलांची होळी व सरकारला सदर मागणीचे निवेदन देण्याचे राज्यस्तरीय व सर्वपक्षीय आंदोलन जाहीर केले आहे. या आंदोलनामध्ये जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाले आहेत. कोरोना विषयक कमी अधिक निर्बंध ठीकठीकाणी आहेत. त्यामुळे स्थानिक परिस्थिती नुसार आंदोलन खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे.
जेथे ग्रीन झोन आहे. कार्यकर्ते व ग्राहकांना एकत्र येण्याची अडचण नाही. तेथे नेहमीच्या पद्धतीने आंदोलन होईल. स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी अथवा महावितरण कार्यालय येथे लोक शक्य असल्यास मोर्चाने जातील अथवा समोर जमतील. बाहेर निषेध म्हणून वीज बिलांची होळी करतील व नंतर आत जाऊन संबंधित अधिकारी यांना भेटून मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांच्या नावे निवेदन देतील. जेथे ग्रामीण भागात आंदोलन करावयाचे आहे. तेथे स्थानिक गावपातळीवर तलाठी कार्यालयासमोर आंदोलन होईल. तलाठी यांचेकडे निवेदन दिले जाईल. शहरात अथवा ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर एकत्र जमणे हेही कांही ठीकाणी कोरोना सद्यस्थितीमुळे अडचणीचे असू शकते. जमावबंदीचा आदेश असतो. अशा ठीकाणी ४ अथवा जास्तीत जास्त ५ लोकांच्या गटाने शेजारील चौकात अथवा घराबाहेर मोक्याच्या ठिकाणी अथवा तेही शक्य नसल्यास खाजगी हद्दीत अथवा एखाद्या हॉलमध्ये अथवा घरात हातात फलक घेऊन आंदोलन केले जाईल. आंदोलन झाल्यानंतर प्रमुख ४/५ कार्यकर्ते स्थानिक कार्यालयात जाऊन निवेदन देतील. आंदोलन व निवेदन या सर्व प्रसंगी योग्य अंतर ठेवणे व मास्क वापरणे याबाबत सर्व शासकीय सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सर्वांना देण्यात आली आहे.
आंदोलन झाल्यानंतर प्रत्येक ठीकाणाहून दिलेल्या निवेदनाची पीडीएफ फाईल मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना ईमेलद्वारे पाठविण्यात येणार आहे. तसेच स्थानिक शेकडो ग्राहकांच्या सह्या घेऊन नंतरही ईमेल पाठविण्यात येणार आहेत. ग्राहकांच्या सह्या घेण्याची व ईमेल पाठविण्याची मोहीम २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्याकडून देण्यात आली.