Join us  

३२ ग्राहकांना २४ तासांत वीजजोडणी

By admin | Published: September 12, 2016 4:07 AM

वीजग्राहकांना अ‍ॅपद्वारे २४ तासांत वीजजोडणी देण्याच्या महावितरणच्या योजनेला गती मिळत आहे. महावितरणने ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणीसह विविध सेवा देणाऱ्या

मुंबई : वीजग्राहकांना अ‍ॅपद्वारे २४ तासांत वीजजोडणी देण्याच्या महावितरणच्या योजनेला गती मिळत आहे. महावितरणने ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणीसह विविध सेवा देणाऱ्या मोबाइल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या ग्राहक सेवांसाठी सुसंगत प्रक्रिया करण्याकरिता अभियंता-कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी मित्र अ‍ॅप, नवीन वीजजोडणी अ‍ॅप, लोकेशन कॅप्चर अ‍ॅप व मीटर रीडिंग अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. हे चारही मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले असून, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केलेल्या ३२ ग्राहकांना अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण करत, २४ तासांमध्ये वीजजोडणी देण्यात आली आहे.नवीन वीजजोडणीसाठी अर्ज मिळाल्यानंतर, त्याची महावितरण अंतर्गत संपूर्ण प्रक्रिया ही आॅनलाइन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधा नव्याने उभारण्याची गरज नाही आणि ज्यांच्या जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होते, त्यांना लवकरात लवकर वीजजोडणी देण्याचे निर्देश व्यवस्थापनाने दिले आहेत. नवीन वीजजोडणीसाठी आॅनलाइन अंतर्गत प्रक्रिया करण्यात येते. यात आता मोबाइल अ‍ॅपचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची कार्यालयीन कार्यवाही आता अ‍ॅपद्वारेच होत आहे. ग्राहकाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, लगेच नवीन वीजजोडणी अ‍ॅपद्वारे ग्राहकाच्या घरी तांत्रिक तपासणीची प्रक्रिया सुरू केली जाते. ही प्रक्रिया मोबाइल अ‍ॅपद्वारेच पूर्ण करून ग्राहकांना कोटेशन देण्यात येते. ग्राहकाने कोटेशनची रक्कम त्वरित भरल्यास पुन्हा अ‍ॅपद्वारेच ग्राहकाच्या घरी मीटर लावून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते, तसेच बिलिंग प्रणालीतही त्याची अ‍ॅपद्वारेच नोंदणी घेण्यात येऊन पुढील महिन्यापासून संबंधित ग्राहकांना वीजबील देण्यात येते. (प्रतिनिधी)