मुंबई : कोरोना काळात आलेल्या वीज बिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले. भरमसाठ आलेल्या वीज बिलांमुळे ग्राहक मेटाकुटीला आला. वीज कंपन्यांना ग्राहकांनी भांडावून सोडले. मात्र वीज बिलाचा प्रश्न काही अजून सूटला नाही. तरीही आपल्याला एवढे वीज बिल कसे आले. ते पुन्हा तपासता येईल का. बिलिंग सायकल कसे आहे. किती युनिट वीज वापरली आहे; अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती वीज ग्राहकांनी वीज कंपन्यांवर केली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणेज हे करताना वीज ग्राहकांनी अधिकाधिक तंत्रज्ञाचा वापर करत स्वतःला टेक्नोसॅव्ही केले.
मुंबईचा विचार करता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ लाख ग्राहकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. यात चॅटबॉट, व्हॉट्स अॅप, वेबसाइट आणि अन्य सोशल मीडिया हँडल्सचा समावेश आहे. विशेषतः लॉकडाउन कालावधीत १.१ लाख ग्राहकांनी व्हॉट्स अॅपद्वारे आपले प्रश्न मांडले आहेत. २८ हजार १७६ ग्राहकांनी ट्विटरवरद्वारे संवाद साधला आहे. तर १ हजार ९३३ ग्राहकांनी फेसबुकद्वारे सेवांचा लाभ घेतला. वेब पोर्टलचा विचार करता चॅटबॉट एलेक्ट्राने जून ते ऑगस्ट २०१२ या कालावधीत १ लाख ५६ हजार २०६ ग्राहकांना प्रतिसाद दिला. यात ३ लाख ७८ हजार २४० ग्राहकांनी त्यांची बिले आणि गणनेची पद्धत समजून घेण्यासाठी वेबसाइटवर बिल स्पष्टीकरण बचत-मदत सुविधेचा उपयोग केला. हेल्प लाइनवर ३.९ लाख फोन आले. यातील ७५ टक्के फोनला उत्तरे देण्यात आली. साथीच्या रोगामुळे व्हिडिओ कॉल सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. व्हिडिओ कॉल सुविधेच्या माध्यमातून एकूण २ लाख ग्राहकांनी सवांद साधला. तर सेल्फ सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर/डिजिटल मोडवर उपस्थित केलेल्या बहुतेक सर्व प्रश्नांना रिअल टाइम उत्तरे देण्यात आली. बिलिंग तक्रारींच्या संदर्भात ९८ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले, अशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून देण्यात आली.
महावितरणचे अधिकारी, मोठ-मोठया सोसायटीमध्ये वीज ग्राहकांसाठी मदत कक्ष स्थापन करून तेथील ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज बिलाबाबत माहिती देत आहेत. आणि वीज बिल भरणा करण्यासाठी विनंती करत आहेत. तसेच, व्हाट्स अप ग्रुप बनवून ग्राहक प्रतिनिधींशी संवाद साधत मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा वीज बिलाबाबत माहिती देण्यात येत आहे. या विविध माध्यमातून दिलेल्या विश्लेषणावर ग्राहक समाधानी असून, अनेक ग्राहकांनी जुलै व ऑगस्ट महिन्याचे वीज बिल भरले आहे, असा दावा महावितरणने केला आहे.
-------------------
- २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते.- एप्रिल व मे सह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात आले होते.- प्रतिबंधित क्षेत्राच्या मर्यादेमुळे काही ठिकाणी जून महिन्यातही मीटर रिडींग शक्य झाले नाही.- काही ग्राहकांना जुलै महिन्यात मीटर रिडींगनंतर चार महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात आले होते.- वीज बिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते.- वीज बिलाबाबत ग्राहकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी वीज कंपन्या विविध मार्गांचा अवलंब करत आहेत.
-------------------
लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे प्रत्यक्ष रिडिंग घेतल्यानंतर जुलै महिन्यात देण्यात आलेले तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल तसेच ऑगस्ट महिन्यात मीटर रीडिंगप्रमाणे आकारलेले वीजबिल अचूक आहे. लॉकडाऊनच्या काळात आजपर्यंत एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केलेला नाही.- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, भांडूप परिमंडल, महावितरण