वीज ग्राहकांनी थकविले ६९३.९९ कोटींचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:06 AM2021-04-24T04:06:11+5:302021-04-24T04:06:11+5:30
महावितरण; मुंबई, ठाणे, रायगडमधील थकबाकीदार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी त्यांची वीज ...
महावितरण; मुंबई, ठाणे, रायगडमधील थकबाकीदार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी त्यांची वीज देयके भरली नाहीत. परिणामी महावितरणची थकबाकी वाढली आहे. तिच्या वसुलीसाठी महावितरणने फेब्रुवारी तसेच मार्च २०२१ मध्ये थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर अनेक ग्राहकांनी थकीत वीजदेयक भरले. पण अजूूनही भांडुप परिमंडळातील मुंबई, ठाणे, रायगडमधील कित्येक ग्राहकांनी देयके न भरल्याने ही थकबाकी एकूण ६९३.९९ कोटींवर पोहचली आहे.
उन्हाचा पारा वाढला असून जवळजवळ २९ हजार मेगावॅटपर्यंत विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या वीजपुरवठ्याला प्राधान्य देऊन घरगुती तसेच सर्व क्षेत्रामध्ये अखंडित वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. त्यासाठी वीज अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. ग्राहकांनी वेळेत वीजबिले न भरल्यास वीजखरेदीत अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना २४ X ७ वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी महावितरणचे वीजबिल इतर बिलाप्रमाणे म्हणजेच टीव्ही रिचार्ज, मोबाइल बिलासारखे प्राधान्याने भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
* ग्राहक थकबाकी (काेटी रुपयांमध्ये)
उच्चदाब व लघुदाब घरगुती ग्राहक १८०.२९
व्यावसायिक ग्राहक १४०.९४ कोटी
औद्योगिक ग्राहक १५०.८५ कोटी
इतर वर्गवारीतील ग्राहक १८.३ कोटी
पाणीपुरवठा योजना ७.६६ कोटी
स्ट्रीट लाईट १९१.५७ कोटी
कृषी ग्राहक ४.३९ कोटी
एकूण ६९३.९९ कोटी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू झाले आहे. सध्या अत्यावश्यक सेवा वगळून सर्वांना ‘वर्क फ्रॉम होम’चे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाइन शिकवणी सुरू आहे. दुसरीकडे, रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून सर्व परिमंडल कार्यालयांना अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, महावितरण
................................................