वीजग्राहकांना मोबाइलवर मिळणार मीटर रिडींगची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 05:43 PM2019-01-19T17:43:30+5:302019-01-19T17:43:34+5:30

महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

Electricity consumers will get meter reading information on mobile phone | वीजग्राहकांना मोबाइलवर मिळणार मीटर रिडींगची माहिती

वीजग्राहकांना मोबाइलवर मिळणार मीटर रिडींगची माहिती

Next

मुंबई - महावितरणकडून वीजग्राहकांनावीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाबाबतची तसेच इतर महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडींगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रिडींगचा फोटो छापण्याची पद्धत सुरू केली होती. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. मात्र यात बील तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रिडींगचा फोटो उपलब्ध होत होता. परंतु आता महावितरणकडून ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबील मिळण्यापूर्वीच मीटर रिडींग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रिडींग पडताळणीसाठी उपलब्ध राहील. तसेच मीटर रिडींगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरूस्त करता येणे शक्य होईल.

फोटो मीटर रिडींग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात येईल. तसेच मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर ग्राहकांना वीजबिलासंबंधी पुरक माहिती देण्यात येईल.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर 'एसएमएस'द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून 'एसएमएस' केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24x7 सुरू असणार्‍या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारे मोबाइल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

सर्व वर्गवारीतील सुमारे दोन कोटी सात लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. उर्वरित वीजग्राहकांनीही महावितरणच्या वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Electricity consumers will get meter reading information on mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.