वीज कंत्राटी कामगारांचा ‘एल्गार’
By admin | Published: March 23, 2017 01:52 AM2017-03-23T01:52:19+5:302017-03-23T01:52:19+5:30
वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपनीतील रिक्त पदांच्या जागेवर, हजारो कंत्राटी कामगार
मुंबई : वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपनीतील रिक्त पदांच्या जागेवर, हजारो कंत्राटी कामगार गेली अनेक वर्षे काम करत असून, राज्यातील जनतेला विजेची सेवा सुलभपणे मिळावी, या करिता कार्यरत आहेत. समान कामासाठी समान वेतन मिळाले पाहिजे, या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे पाहात, महाराष्ट्र शासनाने ‘समान काम, समान वेतन’ देण्याबाबत परिपत्रक काढले आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. परिणामी, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे बुधवारी वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर कंत्राटी कामगारांनी धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्र वीज कंत्राटी संघ व वीज कामगार महासंघ या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, रोजगाराच्या हमीसाठी पूर्वीच्या विद्युत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धत चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
कामगारांसाठी प्रशासनानेच काढलेल्या वेतनविषयक परिपत्रकांचे अनुपालन प्रशासन करत नाही. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्राटदार हे कामगारांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करतात. याबद्दल प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील कामगारांना अनेक ठिकाणी वेतन वेळेत मिळत नाही, तसेच बोनस न मिळणे, भविष्य निर्वाहनिधीची पूर्ण रक्कम खात्यात जमा न करणे, कामगारांनी अॅडव्हान्स घेतलेला नसतानादेखील पे शीटवर ती रक्कम दाखविली जाते आणि त्यावर स्वाक्षरी घेतल्या जातात. याला विरोध करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले जाते. नोकरी गमावण्याच्या भीतिपोटी कामगार तक्रारी करत नाहीत. या विरोधात आवाज उठवत, प्रकाशगड येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. (प्रतिनिधी)