Join us

वीजग्राहकांनो, योग्य सुरक्षा ठेव भरा

By admin | Published: May 09, 2016 2:42 AM

महावितरणकडून एप्रिल, मे आणि जून महिन्यांत बहुतांशी वीजग्राहकांना महिन्याच्या वीजबिलासह सुरक्षा ठेव मागणीचे पत्र बिल स्वरूपात येते, परंतु दरवर्षीच ही मागणी होत असल्याने

मुंबई : महावितरणकडून एप्रिल, मे आणि जून महिन्यांत बहुतांशी वीजग्राहकांना महिन्याच्या वीजबिलासह सुरक्षा ठेव मागणीचे पत्र बिल स्वरूपात येते, परंतु दरवर्षीच ही मागणी होत असल्याने वीज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तथापि, गेल्या वर्षभरातील सरासरी मासिक वीजवापर आणि सध्याचा वीजदरानुसार जेवढे मासिक बिल होते, तेवढी किमान रक्कम सुरक्षा ठेव म्हणून वीजग्राहकांनी भरणे आयोगाच्या आदेशान्वये आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षा ठेव मागणीची रक्कम तपासून योग्य सुरक्षा ठेव रक्कम भरण्याची नोंद वीजग्राहकांनी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने केले आहे.संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ग्राहकांना मासिक वीजबिल येते. त्यांनी सरासरी एक महिन्याच्या वीज बिलाएवढी सुरक्षा ठेवणे आवश्यक आहे, तर शेतकऱ्यांना तीन महिन्यांतून एकदा बिल येत असल्याने त्यांनी तीन महिन्यांच्या एका सरासरी बिलाएवढी सुरक्षा ठेव भरणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक ग्राहकाच्या प्रत्येक बिलावर त्याची पूर्वीची सुरक्षा ठेव किती जमा आहे याची नोंद असते. या हिशेबानुसार सरासरी मासिक बिल पूर्वीच्या सुरक्षा ठेवीपेक्षा जास्त असेल, तर फरकाची रक्कम ग्राहकाकडे मागितली जाते. त्यामुळे याप्रमाणे हिशेबानुसार मागणी योग्य असेल, तर ती भरणे आवश्यक आहे. मागणी जास्त असेल, तर संबंधित कार्यालयात जाऊन ग्राहकाला दुरुस्तही करता येईल, असेही होगाडे यांनी सांगितले.