वीजचोरांना महावितरणसह पोलिसांचे अभय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 03:16 AM2018-08-26T03:16:47+5:302018-08-26T03:17:14+5:30

एपीएमसी परिसरातील प्रकार : विजेचा धक्का बसल्याने गाईचा मृत्यू; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Electricity disbursement to police | वीजचोरांना महावितरणसह पोलिसांचे अभय

वीजचोरांना महावितरणसह पोलिसांचे अभय

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये वीजचोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चोरून नेलेल्या वीजवाहिनीमुळे शॉक बसल्याने शुक्रवारी गाईचा मृत्यू झाला. सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. महावितरणसह पोलीसही चोरट्यांना पाठीशी घालत असून, प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बाजार समितीच्या निर्यात भवनजवळ जमिनीवरून वीजपुरवठा करणारी वायर नेण्यात आली होती. जमिनीवरून असलेली वायर तुटली असल्यामुळे तेथे विजेचा धक्का बसू लागला होता. शुक्रवारी विजेचा धक्का लागल्यामुळे गाईचा मृत्यू झाला. जवळच मस्जीद असल्यामुळे तेथे नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते. गाईऐवजी नागरिकांना शॉक लागला असता, तर जीवितहानी झाली असती. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, चोरून वीजपुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी वायर टाकण्यात आली होती. दुर्घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व वीजचोरी करणाºयांनी तेथील वायर गायब केली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे; पण या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्घटना कशामुळे घडली, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. महावितरण व पोलिसांनी वीजचोरांना पाठीशी घालून प्रकरण दडपण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गाईचाच मृत्यू झाला आहे. नागरिकांचा मृत्यू झालेला नाही, असे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताला जबाबदार असलेल्या चोरांवर व महावितरण कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक होते.

धान्य मार्केटच्या समोरील बाजूला सिडकोच्या भूखंडावर झोपड्यांचे प्रमाण वाढले आहे. या झोपड्यांना चोरून वीज पुरविली जात आहे. सलीम व इम्रान हे दोन जण चोरून वीज, पाणी पुरविण्याचा व्यवसाय करत आहेत. प्रत्येक झोपडीधारकाकडून प्रत्येक महिन्याला ४०० रुपये घेतले जात आहेत. यामधील काही वाटा संबंधित विभागाच्या कर्मचाºयांना दिला जात असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून वीजचोरी सुरू असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे महावितरण अधिकारी व कर्मचाºयांच्या हेतूवर संशय घेतला जात आहे.
वीज व पाणी पुरविणारे मोठे रॅकेट परिसरामध्ये सक्रिय आहे. रॅकेट चालविणाºयांनी दहशत निर्माण केली आहे. काही जणांवर मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. येथील काही झोपड्यांमध्ये अवैधपणे दारू, गांजाची विक्रीही केली जात आहे.

गुन्हा दाखल नाहीच
वीजचोरांनी अंथरलेल्या वायरमुळे गाईचा मृत्यू झाला आहे. वास्तविक या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. चोरून वीज कोणत्या कंपनीला दिली होती, दुसºया कोणाला तरी याची पाहणी करणे आवश्यक आहे. एपीएमसी पोलीस स्टेशन व नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला; परंतु उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.

महिना ४०० रुपये शुल्क
एपीएमसी परिसरातील झोपडपट्ट्या व इतर अनधिकृत व्यावसायिकांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट कार्यरत आहे. प्रत्येक झोपडीधारकाकडून महिन्याला ४०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठीही शुल्क आकारणी केली जात आहे. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू असून त्याकडे महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
उत्सव मंडळांवर होते कारवाई
गणपती, नवरात्रोत्सवामध्ये आठ ते दहा दिवसांसाठी मंडळांना वीजमीटर घेण्याची सक्ती केली जाते. चोरून वीज घेतल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते; परंतु एपीएमसी परिसरामध्ये वर्षानुवर्षे वीज, पाणी चोरून वापरले जात असून, संबंधितांवर काहीही कारवाई केली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Electricity disbursement to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.