वनविभागाच्या हद्दीत घरगुती दराने वीज; २५ हजार नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:08 AM2021-08-26T04:08:33+5:302021-08-26T04:08:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरातील वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतींतील वीज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरातील वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतींतील वीज ग्राहकांना घरगुती दराने आकारणी करण्याचे निर्देश अदानी इलेक्ट्रिसिटीला देण्यात आले आहेत. येथील वसाहतीतील सुमारे साडेपाच हजार घरांतील २५ हजार नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
वनविभागाच्या नागरिकांना अडथळ्यांमुळे वैयक्तिक घरगुती वीजजोडणी घेता येत नाही. त्यावर तोडगा म्हणून सामायिक मीटरद्वारे वीजपुरवठा होत असल्याने त्यांना स्लॅब रेटचा फायदा होत नाही. त्यांना वाढीव दराने वीज बिल भरावे लागत आहे. ते परवडणारे नाही. यावर तोडगा काढून ग्राहकांना वैयक्तिक वीजजोडण्या देऊन घरगुती वीजदराची आकारणी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणच्या वाणिज्य विभागाचे संचालक सतीश चव्हाण व अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत दिले. सदर भागाचे सर्वेक्षण करून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत अहवाल ऊर्जा कार्यालयाला सादर करण्याचे निर्देशही देतानाच वन विभागाच्या सहकार्याने यावर तोडगा निघेल, अशी आशाही बैठकीत व्यक्त करण्यात आली.