Join us

पालिकेची सौर ऊर्जेतून ५ हजार युनिटची वीजनिर्मिती, ४२ हजार वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 10:27 AM

वीज वाचविण्यासह पर्यावरण पूरकता जपणे आणि पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेकडून उपक्रम राबविले जातात.

मुंबई - मुंबई महापालिकेने पर्यावरणातून ऊर्जा निर्मितीची कास धरली आहे. चेंबूरच्या एम पश्चिम वॉर्ड कार्यालयाच्या गच्चीवर सौर ऊर्जा यंत्रणा बसविली आहे. या यंत्रणेतून महिन्याकाठी ५ हजार युनिट ऊर्जेची निर्मिती होणार असून दरमहा सुमारे ४२ हजार ५०० रुपयांची बचतही होणार आहे.

वीज वाचविण्यासह पर्यावरण पूरकता जपणे आणि पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेकडून उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून पर्यावरण पूरकता व ऊर्जा बचत साध्य करण्याच्या उद्देशाने विभाग कार्यालयाच्या गच्चीवर सौर ऊर्जा यंत्रणा नुकतीच कार्यान्वित केली. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणाऱ्या ऊर्जेचा वापर विभाग कार्यालयासाठी करणार असून यामुळे दरमहा सुमारे ४२ हजार ५०० रुपयांची बचत करणे शक्य होणार आहे, अशी माहिती ‘एम पश्चिम’ विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली. कार्यालयातच विजेचा वापर होणार आहे. भविष्यात अशाच प्रकारचा प्रयोग अन्य ठिकाणी करता येईल का याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

९३ सौर ऊर्जा पॅनल‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या गच्चीचा आकार हा १८ हजार चौरस फूट इतका असून यापैकी सुमारे २ हजार १०० चौरस फूट जागेत ९३ सौर ऊर्जा पॅनल बसविले आहेत. या पॅनलद्वारे मिळणारी ऊर्जा ही  ‘डीसी’ प्रकारची आहे. विद्युत उपकरणांना ‘ एसी ‘ प्रकारची विद्युत ऊर्जा लागत असल्याने सौर ऊर्जा पॅनलद्वारे प्राप्त होणाऱ्या ‘ डीसी ‘ ऊर्जेचे रूपांतर सर्वप्रथम ‘ एसी ‘ मध्ये केले जाते. त्यानंतर ती ऊर्जा विद्युत पुरवठादार कंपनीला मीटरच्या माध्यमातून दिली जाते. 

३४ लाख ६ हजारांचा खर्च५० किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पाद्वारे दरमहा साधारणपणे ५ हजार युनिट विजेची निर्मिती केली जाणार आहे. पुढील पंचवीस वर्षात साधारणपणे रुपये १ कोटी २७ लाखांची विद्युत खर्चातील बचत साध्य होणार आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ३४ लाख ६० हजार रूपयांचा खर्च झाला असून हा प्रकल्प खर्च पुढील सहा वर्षात वसूल होईल.