घारापुरी लेण्यांमध्ये सहा महिन्यांत वीज
By Admin | Published: August 17, 2016 04:03 AM2016-08-17T04:03:35+5:302016-08-17T04:03:35+5:30
मुंबईनजीकच्या समुद्रातील सुप्रसिद्ध घारापुरी (एलिफन्टा) लेण्या आणि त्या परिसराचे अंधाराचे दिवस आता लवकरच संपणार असून
मुंबई : मुंबईनजीकच्या समुद्रातील सुप्रसिद्ध घारापुरी (एलिफन्टा) लेण्या आणि त्या परिसराचे अंधाराचे दिवस आता लवकरच संपणार असून, त्या ठिकाणी येत्या सहा महिन्यांत विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
न्हावाशेवा, जेएनपीटीनजीकच्या मोराबंदर गावातून समुद्रमार्गे केबल टाकून घारापुरीला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे हे काम निविदेद्वारे केबल कॉर्पोरेशन आॅफ इंडियाला देण्यात आले आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले की, येत्या एक महिन्यात केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. घारापुरी येथे वीज उपकेंद्र आणि वीजपुरवठा यंत्रणा उभारण्याच्या कामाची वेगळी निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. सहा महिन्यांत हे कामही पूर्ण करण्यात येईल.
आज घारापुरीमध्ये राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून सायंकाळी ७.३० ते रात्री ११ या वेळेत जनरेटरद्वारे वीजपुरवठा केला जातो. देखभाल, दुरुस्तीचे कामही महामंडळ करते. त्या मोबदल्यात प्रत्येक घराकडून केवळ १५० रुपये बिल महिन्याकाठी आकारले जाते.
आधी गेट वे आॅफ इंडियापासून केबल टाकून वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, हे अंतर जास्त होते, तसेच या मार्गावर चालणाऱ्या जलवाहतुकीत त्यामुळे अडचणी आल्या असत्या. त्यामुळे जेएनपीटीपासून वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमच्या गावात २४ तास वीज आल्याने येथे पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल. वर्षानुवर्षांची आमची मागणी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, असे मत घारापुरीचे सरपंच राजेंद्र पडते, यांनी मांडले. (विशेष प्रतिनिधी)