विजेची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:21 PM2020-08-15T16:21:37+5:302020-08-15T16:22:40+5:30
अँड्रॉइड आणि आयओएस अॅपची घोषणा
मुंबई : वीज ग्राहकांना आता त्यांचे मीटर रीडिंग नोंदविणे, देयक भरल्याची पावती मिळविणे या गोष्टींसह बोटांचे ठसे, चेहरा यांच्यामार्फत अथवा ओटीपीद्वारे लॉगइन, नजीकचे ग्राहकनिगा केंद्र / जीनियस पे किऑस्कची माहिती मिळविणे तसेच महिनागणिक वीज-वापराच्या प्रवाहाला जाणून घेण्यास मदत मिळणार आहे. कारण अदानी इलेक्ट्रिसिटीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तिच्या अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही व्यासपीठांवर चालणाऱ्या मोबाईल अॅपच्या नवीन सुधारीत आवृत्तीची घोषणा केली आहे. या अॅपच्या मदतीने देयक भरणा, देयकाची प्रत डाऊनलोड करणे, मीटर रीडिंग तपासणे आणि भरलेल्या देयकांची पूर्वेतिहास, वीजदराची माहिती असे तपशील ग्राहकांना उपलब्ध होतील. ग्राहकाला जर त्याच्या खात्यासंबंधी विशिष्ट माहिती व्हॉट्सअॅप संदेशाच्या रूपात हवी असेल तर तसा पर्याय ते नवीन अॅपच्या माध्यमातून मिळवू शकतील.
ग्राहकांना त्यांच्या मीटरचे रीडिंग स्वत: या अॅपच्या माध्यमातून नोंदविता येईल. कर्मचाऱ्याकडून जर मीटर रीडिंग झाले असल्यास तसे ग्राहकाला सूचित केले जाईल. पुढील मीटर रीडिंगची तारीखही कळविली जाईल. ग्राहक आता त्यांच्याकडून रोखीतून अथवा अॅप यापैकी कोणत्याही माध्यमातून भरणा झालेल्या देयकाची पावती आता अॅपवरून डाऊनलोड करून मिळविता येईल. नोंदणी आणि लॉगइनची प्रक्रिया विनासायास करण्यासाठी ग्राहक आता या अॅपवर लॉगइन हे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे नऊ अंकी खाते क्रमांक, बोटांचे ठसे, चेहऱ्याची ओळख पटवून करू शकतील. सर्व ग्राहक संपर्क केंद्र आणि जीनियस पे किऑस्क हे आता अॅपच्या माध्यमातून शोधणे आणि गुगल मॅपच्या साहाय्याने इच्छित ठिकाणी पोहचण्यासाठी दिशादर्शनही मिळविता येईल. ग्राहक आता त्यांच्याकडून मागील एक वर्षात झालेल्या विजेच्या वापराचा महिना दर महिना तौलनिक तपशील मिळवू शकतील.