Join us

मुंबईत बत्ती गूल; आर्थिक राजधानी दोन तास ठप्प, बिघाडाचे नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 5:18 AM

महापारेषणच्या या बिघाडाचा शहर आणि उपनगरातील बेस्ट, टाटा आणि अदानी या वीज कंपन्यांच्या ग्राहकांना फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईलावीजपुरवठा करणाऱ्या मुलुंड-ट्रॉम्बे या २२० किलोवॅट वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून जवळपास दोन तास मुंबईच्या विविध भागातील वीजपुरवठा ठप्प झाला. देशाच्या आर्थिक राजधानीची बत्ती गूल झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला. महापारेषण, बेस्ट, अदानी, टाटा यांचा  वीजपुरवठा परस्परांशी जोडलेला असल्याने महापारेषणच्या या बिघाडाचा शहर आणि उपनगरातील बेस्ट, टाटा आणि अदानी या वीज कंपन्यांच्या ग्राहकांना फटका बसला. त्यातही टाटा आणि बेस्टच्या ग्राहकांचे प्रमाण मोठे होते.

वीजपुरवठा बंद झाल्याने मोठा फटका बसला, तो लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना. बराच काळ नेमके काय घडले आहे, तेच प्रवाशांना समजत नव्हते. लांब पल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्या होत्या. रुग्णालयांतील सेवाही यामुळे विस्कळीत झाल्या. जेथे जनरेटर होते, तेथे तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत झाला, पण अन्यत्र अंधार होता. खासगी रुग्णालयांना याचा मोठा फटका बसला. ज्या इमारतींत बॅकअपची सुविधा नव्हती, तेथील लिफ्ट बंद पडल्या. अनेक सोसायट्यांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. अनेक ठिकाणी मॉल, मोठी संकुलेही विजेअभावी बंद पडली.

सकाळी ११ च्यासुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा बेस्टने केला असला, तरीदेखील टप्प्याटप्प्याने बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन तासांचा काळ लागला. मुंबईत वीज वाहून आणणारी एकच वाहिनी सध्या उपलब्ध आहे. काही तांत्रिक अडचण आल्यास पर्यायी वाहिनीची गरज आहे. या बत्ती गुलमुळे ही गरजही प्रकर्षाने पुढे आली. मुंबईचा वीजपुरवठा रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ असा विविध भागात दोन तास खंडित झाला होता. काही ठिकाणी तासाभरात वीजपुरवठा सुरळीत झाला.

बिघाडाचे काय होते कारण? दुरुस्तीच्या कामांना लगेच सुरुवात 

तांत्रिक बिघाडामुळे रविवारी दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणने लवकर पूर्ववत केला. दुरुस्तीची कामे पाऊण ते एक तासात पूर्ण करण्यात आल्याचा दावा कंपन्यांनी केला. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे काही वीज वाहिन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचदरम्यान पर्यायी वीज वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

कुठे झाली बत्ती गूल?

मुंबई शहरात सायन, कंबाला हिल, खेतवाडी, बँक बे, वडाळा, ॲन्टॉप हिल, भुलेश्वर, काळबादेवी, ताडदेव, भायखळा, माझगाव, काळाचौकी, परळ, फोर्ट, सीएसएमटी, दादर, माहीम यासारख्या परिसरांसह मुंबईच्या उपनगरातील अदानी वीज कंपनीचा सांताक्रूझसह लगतचा परिसर आणि टाटा पॉवरचा चेंबूरसह लगतचा परिसर वीजपुरवठा खंडित झाल्याने ठप्प झाला होता.

५० लोकल रद्द, चर्चगेट ते अंधेरी ठप्प

मुंबईतील बहुतांश भागांतील वीजपुरवठा रविवार सकाळी खंडित झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठा फटका बसला. सकाळच्या वेळेत  ५० उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या. १४० गाड्या उशिराने धावल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. सुटीचा दिवस असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले नाहीत. पण सुट्टीची संधी साधून बाहेर पडलेले ठिकठिकाणी अडकून पडले.  

टॅग्स :वीजमुंबई