मुंबई : कंत्राटीकरणाविरोधात एल्गार करत महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमधील कामगारांनी गुरुवारी सकाळी वांद्रे पूर्वेकडील प्रकाशगडावर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. कंत्राटी कामगार नेमण्याऐवजी थेट खात्यामार्फत ‘रोजंदारी कामगार’ म्हणून नेमणूक करा, अशी एकमुखी मागणी कामगारांचे नेतृत्व करणाºया महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केली आहे.फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी सांगितले की, कामगारांना समान काम समान वेतन लागू करण्याची गरज आहे. अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील वीज कामगार एकत्र एकवटले आहेत. तिन्ही कंपन्यांतील स्थायी कामगार, कंत्राटी कामगार, आऊटसोर्सिंग कामगार, सुरक्षारक्षक व शिकाऊ उमेदवार यांच्या प्रलंबित २१ मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कामगारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या चर्चेत वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर स्वतंत्र चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन कुमार यांनी दिल्याचा दावा भोयर यांनी केला. तर महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल यांच्याकडेही फेडरेशनने वीज कामगारांचे म्हणणे मांडले. दरम्यान, महापारेषण कंपनीमधील आॅपरेटरांना निवृत्त होईपर्यंत काम देण्याचे मित्तल यांनी आश्वासित केल्याचा दावा भोयर यांनी केला आहे. महापारेषण कर्मचाºयांच्या बदल्या करणार नाही, १३२ के. व्ही. उपक्रमामध्ये कपात केलेल्या जागांवर चर्चा करू, तसेच इतर मागण्यांवरही सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन मित्तल यांनी दिल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत ३ जानेवारीला फेडरेशनच्या शिष्टमंडळाची बैठक होईल. या वेळी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होईल. त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा फेडरेशनने दिला आहे.
वीज कामगारांचा ‘प्रकाशगडा’वर एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 5:27 AM