मुंबई :- म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमधील विद्युत मीटर उपअभियंता किंवा मिळकत व्यवस्थापक यांच्या नावे न घेता संबंधित पात्र गाळेधारकाच्या नावे घेण्यात यावे. तसेच सध्या मंडळाच्या नावे असणारी विद्युत मीटर तात्काळ संबंधित पात्र भाडेकरूंच्या नावे करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी परिपत्रकाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण ताबा पत्र गाळेधारकाला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी (संक्रमण शिबीर गाळे) यांच्या कार्यालयामार्फत केली जाते. संबंधित गाळेधारकाच्या नावे विद्युत मीटर बसविण्यासाठी वा गाळेधारकाच्या नावावर करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देताना संबंधित गाळेधारकाच्या पात्रतेबाबतचे पुरावे , चालू महिन्याच्या सेवा शुल्क भरल्याची ताबा पावती, वितरण आदेश, व्हेकेशन नोटीस व तत्सम बाबी यांची पडताळणी करण्यात यावी.तसेच मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी (संक्रमण शिबीर गाळे) यांच्या स्तरावर पात्र गाळेधारकास वीज मीटर बसविण्याबाबत किंवा त्यांचे नावे करणेबाबत ना-हरकत प्रमाण पत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. विभागीय मंडळात मुख्य अधिकारी यांनी ना-हरकत पत्र देण्याची कार्यवाही करावी, असेही निर्देश म्हैसकर यांनी दिले आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे किंवा इतर विभागीय मंडळातर्फे विक्रीसाठी सदनिका बांधल्या जातात. सदनिकांमध्ये विजेचे मीटर सध्याच्या पद्धतीप्रमाणे उप अभियंता यांच्या नावे घेतले जातात. तथापि असे आढळून आले आहे की, लाभार्थींनी विजेची बिले न भरल्यामुळे विजेच्या देयकांची वसुली वीज मंडळ 'म्हाडा'कडून करते.सदरची पद्धत ही अयोग्य आहे. अशा प्रकारे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत बांधलेल्या पुनर्रचित इमारतींमध्ये किंवा संक्रमण शिबिरांमध्ये वीजेचे मीटर उपअभियंता यांच्या नावे घेतले जातात. यापुढे या परिपत्रकातील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश श्री. म्हैसकर यांनी दिले आहेत.
''म्हाडाच्या संक्रमण गाळ्यांमधील विद्युत मीटर तात्काळ संबंधित पात्र भाडेकरूंच्या नावे करावे''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:06 PM