सार्वजनिक शौचालयांना वीज, पाणी
By admin | Published: December 25, 2016 04:25 AM2016-12-25T04:25:46+5:302016-12-25T04:25:46+5:30
मुंबई शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर येथे वीज आणि पाण्याची सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर येथे वीज आणि पाण्याची सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली आहे. विशेषत: आयुक्त अजय मेहता यांनी यासंबंधीचे आदेश दिले असून, याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शौचालयांची व्यवस्था योग्य प्रकारे लागल्यानंतर ही शौचालये दैनंदिन परिरक्षणाकरिता वस्ती पातळीवरील संस्थांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक शौचालयांमधील अंधार किंवा पाणीपुरवठा नसणे यासारख्या कारणांमुळे अनेकदा त्यांचा योग्य वापर होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये महापालिकेद्वारे वीज व पाणी सुविधा देण्याबाबत प्राथमिक कार्यवाही करण्यासाठी भांडवली खर्च करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले होते. याबाबतची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे.
महापालिका क्षेत्रात सुमारे १७ हजार सार्वजनिक शौचालये असून, यामध्ये महापालिका, म्हाडा, इतर सरकारी यंत्रणा, खासगी सार्वजनिक शौचालये व अन्य सार्वजनिक शौचालयांचा समावेश आहे.
नागरिकांसाठी सुविधा व त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांव्यतिरिक्त इतर संस्थांद्वारे बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्येही वीज व पाणीपुरवठा देण्याबाबत भांडवली खर्च करण्याची जबाबदारी महापालिकेने सुरुवातीच्या कालावधीकरिता घेतली आहे. त्याची कार्यवाही मार्च २०१७च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या शौचालयांची व्यवस्था योग्य प्रकारे लागल्यानंतर ती दैनंदिन परिरक्षणाकरिता वस्ती पातळीवरील संस्थांकडे हस्तांतरित केली जातील, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता सिराज अन्सारी यांनी दिली आहे. या शौचालयांचे परिरक्षण, साफसफाई, नळ जोडणी व विद्युत व्यवस्था आदी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. महापालिकेद्वारे सुविधा पुरविण्याची कार्यवाही काही कालावधीकरिता करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
आवश्यक सेवांअभावी शौचालयांचा वापर करण्यात अडचणी
मुंबई महापालिका क्षेत्रात महापालिकेसह म्हाडा, राज्य सरकार, केंद्र सरकार यासारख्या विविध संस्थांची १६ हजार ९९९ सार्वजनिक शौचालये आहेत. या सर्व शौचालयांमध्ये एकूण १ लाख १६ हजार ४४६ इतके शौचकूप आहेत. यापैकी काही शौचालयांमध्ये वीज अथवा पाणीपुरवठा सुविधा नसल्याने त्यांचा वापर होण्यास अडचणी येत होत्या.
विद्युत पुरवठा नसणाऱ्या सार्वजनिक शौचालयांमध्ये अंधार झाल्यावर तिथे जाण्यास महिलांना, लहान मुलांना समस्या येतात. या सर्व बाबींचा विचार करून हे पाऊल उचलले जात आहे.