चेंबूरमध्ये वीजपुरवठा खंडित
By admin | Published: April 30, 2017 04:37 AM2017-04-30T04:37:59+5:302017-04-30T04:37:59+5:30
गेल्या १० ते १२ वर्षांपासून चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील सुमारे तीन हजार झोपडीधारकांनी वीज बिल भरले नसल्याने शनिवारी रिलायन्सच्या अधिकारी वर्गाने यातील
मुंबई : गेल्या १० ते १२ वर्षांपासून चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील सुमारे तीन हजार झोपडीधारकांनी वीज बिल भरले नसल्याने शनिवारी रिलायन्सच्या अधिकारी वर्गाने यातील निम्म्या झोपडीधारकांचा वीजपुरवठा खंडित केला. ऐन उकाड्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील वातावरण ‘तापले’ होते.
चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी येथे तीन हजारपेक्षा जास्त झोपड्या आहेत. दहा वर्षांपूर्वी एका विकासकाने या परिसरात एसआरए अंतर्गत विकास करण्यासाठी रहिवाशांसमोर प्रस्ताव आणला. विकासक आणि झोपडीधारकांमध्ये सहमती झाल्यावर विकासकाने परिसरातील सर्व झोपडीधारकांचे वीज बिल भरण्याचे आश्वासन दिले. विकासक वीज बिल भरणार असल्याने रहिवाशांनी वीज बिल भरले नाही. त्यामुळे प्रत्येकी झोपडीधारकाचे वीज बिल हे चार ते पाच लाखांच्या घरात गेले आहे.
रिलायन्स कंपनीकडून या रहिवाशांना अनेकदा वीज बिल आणि नोटीस देण्यात आल्या होत्या. मात्र वीज बिल भरण्यात आले नाही. परिणामी शनिवारी सकाळीच रिलायन्सचे अधिकारी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह सिद्धार्थ कॉलनीत दाखल झाले आणि त्यांनी निम्म्या परिसराचा वीजपुरवठा खंडित केला. मात्र अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त सकाळपासूनच तैनात केला होता. (प्रतिनिधी)
- चेंबूरचा सिद्धार्थ कॉलनी परिसर वगळता अन्य ठिकाणी जर तीन ते चार महिने वीज बिल रखडल्यास रिलायन्सकडून तत्काळ त्याची वीज खंडित करण्यात येते. त्यानंतर मीटर देखील काढण्यात येतो. मात्र या ठिकाणी १० ते १२ वर्षांचे बिल असताना रिलायन्स अधिकारी एवढे दिवस काय करत होते, असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे.
काही रहिवाशांच्या मते आम्ही बिल भरण्यास तयार आहोत. मात्र कंपनीने आम्हाला महिन्याची काही रक्कम ठरवून द्यावी. मात्र काही रहिवासी मागील बिल भरण्यास तयार नाहीत. कंपनीने या महिन्यापासून आम्हाला बिल पाठवावे आम्ही ते भरू, मात्र शिल्लक रक्कम विकासकाकडून वसूल करावी, असे काही रहिवाशांचे म्हणणे आहे.