मुंबई : गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठ्यात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट आणि हुतात्मा चौक परिसरासह आणखी काही ठिकाणी बत्ती गुल झाल्याच्या घटना घडल्या. सकाळी ५ वाजता सुरू झालेली ही समस्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत कायम राहिल्याने दक्षिण मुंबईत काही कालावधीच्या अंतराने वीजपुरवठा खंडित होत होता, तर काही काळाने पूर्ववत होत होता. परंतु पूर्णत: वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी सायंकाळचे पाच वाजल्याचे चित्र होते.मुंबई शहरात बेस्टकडून वीजपुरवठा केला जातो, तर हीच वीज टाटाकडून बेस्टला पुरविली जाते. नेमके गुरुवारी टाटा पॉवरच्या ‘रिसिव्हिंग स्टेशन’चे काम हाती घेण्यात आले होते. आणि या कारणांमुळे दक्षिण मुंबईतील ठिकठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित होईल, अशी पूर्वसूचना टाटाने बेस्टला दिली होती. परंतु ‘रिसिव्हिंग स्टेशन’च्या कामादरम्यान विलंब होण्यासह तांत्रिक समस्या निर्माण झाली. परिणामी दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट, हुतात्मा चौक, मुंबादेवी, गिरगाव आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. भल्या पहाटे निर्माण झालेली ही तांत्रिक समस्या निकाली लागण्याकरिता सायंकाळचे पाच वाजले. परिणामी मधल्या काळात या ठिकाणांवर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यानंतर मात्र येथील वीजपुरवठा पूर्ववत झाला, अशी माहिती बेस्ट आणि टाटा पॉवरच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडित
By admin | Published: January 08, 2016 2:20 AM