विजेचा दर मर्यादित राहणार, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार

By सचिन लुंगसे | Published: March 13, 2024 06:48 PM2024-03-13T18:48:59+5:302024-03-13T18:49:31+5:30

Mumbai News: राज्यातील विजेची वाढती मागणी पूर्ण करता यावी म्ह्णून ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने सतलज जल विद्युत निगम लिमिटेड तसेच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यांच्यासोबत दोन करार केले आहेत.

Electricity tariff will be capped, 3300 MW green power purchase agreement to meet rising demand | विजेचा दर मर्यादित राहणार, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार

विजेचा दर मर्यादित राहणार, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार

मुंबई - राज्यातील विजेची वाढती मागणी पूर्ण करता यावी म्ह्णून ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने सतलज जल विद्युत निगम लिमिटेड तसेच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यांच्यासोबत दोन करार केले आहेत. वीज खरेदीचा दर माफक असल्याने वीज खरेदी खर्चात बचत होईल; आणि त्यामुळे विजेचा दर मर्यादित ठेवण्यास मदत होईल, असा दावा महावितरणने केला आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार करण्यात आले असून, यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

महावितरणने केलेल्या करारांमुळे वीज खरेदीमध्ये बचत होईल. हरित ऊर्जेसाठीची जबाबदारी पूर्ण करण्यात मदत होईल. त्यामुळे ‘नेट झिरो’चे उद्दीष्ट गाठण्यास मदत होईल. ही पर्यावरण पूरक ऊर्जा असल्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. महावितरणची विजेची मागणी सुमारे २५ हजार ४१० मेगावॅट असून वीज पुरवठ्यासाठी करार झालेली क्षमता आता ४१ हजार ५७० मेगावॅटवर पोहोचली आहे. त्यामध्ये अक्षय ऊर्जेसाठी करार झालेली क्षमता १४,५५१ मेगावॅट आहे.
 
देशातील बॅटरी स्टोरेज आधारित ग्रीन एनर्जीचा वापर पीकिंग अवर्समध्ये म्हणजे कमाल मागणीच्या वेळी होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा उपलब्ध नसतानाच्या कालावधीत महाग वीज खरेदीची आवश्यकता राहणार नाही. करारांमुळे नवीनीकरणीय ऊर्जा बंधनाचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होईल. वीज खरेदी खर्चात बचत होईल. ग्राहकांना किफायतशीर दरात वीज मिळेल.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
 
ऊर्जा क्षमता ९,१५५ मेगावॅटने वाढणार
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणे आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या कल्पक योजनेअंतर्गत महावितरणची नवीकरणीय ऊर्जा क्षमता ९,१५५ मेगावॅटने वाढणार आहे.

महावितरणचे संचालक योगेश गडकरी आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेडचे कार्यकारी संचालक पवन वर्मा यांनी १८०० मेगावॅट नविनीकरणीय ऊर्जेसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे अक्षय ऊर्जेवर आधारित स्टोरेज क्षमता निर्माण होणार आहे. योगेश गडकरी आणि नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक रणजीत ठाकूर यांनी १५०० मेगावॅट सौर ऊर्जेसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Web Title: Electricity tariff will be capped, 3300 MW green power purchase agreement to meet rising demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.