महावितरणची मोठी कारवाई! ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस

By सचिन लुंगसे | Published: December 7, 2022 06:42 PM2022-12-07T18:42:59+5:302022-12-07T18:46:15+5:30

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करून केलेली कारवाई यशस्वी झाली आहे.

Electricity theft of 50 lakh units revealed | महावितरणची मोठी कारवाई! ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस

महावितरणची मोठी कारवाई! ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस

Next

मुंबई : वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करून केलेली कारवाई यशस्वी झाली आहे. केवळ तीन महिन्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आली आहे. 

महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स निश्चित केले. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले.

संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली व कारवाई केली. परिणामी त्या त्या भागातील वीजचोरीला आळा बसला असून ५ दशलक्ष युनिटची वीजचोरी रोखली गेली आहे. महावितरणच्या घरगुती ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक हे शंभर युनिट वीज वापरणारे असून अशा पन्नास हजार ग्राहकांच्या एक महिन्याच्या वीजवापराएवढी ही वीज आहे.

महावितरणने वीजगळती रोखण्यासाठी आक्रमकपणे काम सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून फीडर्सपैकी वीज गळतीच्या बाबतीत टॉपर्स निश्चित करून कारवाई करण्याची रणनिती आखली. त्या त्या झोनमध्ये कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निश्चित केलेल्या फीडर्सची जबाबदारी देण्यात आली. काही ठिकाणी पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत गळती होती. ती वीस टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. तर तीस टक्के ते पन्नास टक्के गळती असलेल्या फीडर्सची गळती पंधरा टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. पहिल्या तीन महिन्यात मिळालेल्या यशामुळे अधिकारी उत्साहित झाले असून ही मोहीम उद्दीष्ट गाठेपर्यंत पुढे चालू ठेवण्यात येईल.

महावितरणतर्फे सध्या थकित वीजबिलांच्या वसुलीबरोबरच वीजचोरी रोखण्यावर भर देण्यात आहे. त्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. अधिक वीजगळती असलेले फीडर्स शोधून त्याबाबतीत कारवाई करण्याचा उपाय त्याचा भाग आहे, असे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.

Web Title: Electricity theft of 50 lakh units revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.