ड्रोनद्वारे पकडली दोन कोटींची वीजचोरी; बंद मीटरला बायपास करून ट्रान्सफॉर्मरला जोडली मोठी केबल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 07:36 AM2023-09-03T07:36:37+5:302023-09-03T07:36:53+5:30
इतर दोन जोडण्यांचा वीज थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे.
मुंबई : वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करून उच्चदाबाच्या ट्रान्सफॉर्मरला थेट मोठी केबल जोडून विजेची चोरी करणाऱ्या चोराचा ड्रोनच्या मदतीने छडा लावण्यात आला आहे. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून, या प्रकरणी त्याला २ कोटी ४ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
पुण्यातील सणसवाडी येथे मुकेश ओमप्रकाश अगरवाल यांच्या मालकीच्या तीन कंपन्या आहेत. थर्मोलाइट पॅकेजिंग इंडिया व प्रकाश कोरुगेटेडे हे दोन उच्चदाबाचे तर भगवान ट्यूब हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात आहेत. थर्मोलाइट पॅकेजिंग इंडियाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद केला होता. इतर दोन जोडण्यांचा वीज थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे.
पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या उच्चदाब ट्रान्सफॉर्मरमधून थेट वीज सुरू केल्याची माहिती कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना मिळाली. दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या कानावर घातली. पावडे यांनी ड्रोनची मदत घेण्यास सांगितले.
दरवडे आठ जणांच्या पथकासह गेले. कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने त्यांनी मित्रासह आत प्रवेश मिळवून ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू केले व तोच ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि पर्दाफाश केला.
बिघाड कमी वेळेत दूर
दुर्गम भागात ड्रोनच्या साहाय्याने वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासह विजेचे वहन करण्यासाठी महापारेषणकडून ड्रोनचा वापर केला जातो. अति उच्चदाब वाहिनी आणि उपकेंद्रांमधील बिघाड कमी वेळेत दूर केले जातात.
बिघाड निदर्शनास
ड्रोनद्वारे यापूर्वी सर्वेक्षण झाले असून, यात मुख्यत्वे गहाळ झालेले नटबोल्ट्स, कॉटर पीन्स, कंडक्टवरील हार्डवेअर्स, फुटलेले इन्शुलेटर्स आदी बिघाड निदर्शनास आले आहेत. यामुळे दुरुस्ती करण्यास वाव मिळाला आहे.
कोणता कॅमेरा
ड्रोनवर व्हिडीओ कॅमेरा आणि थर्मोविजन कॅमेरा लावला असल्याने पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे दोष त्वरित निदर्शनास आणून त्याची दुरुस्ती करणे शक्य होत आहे.