पाण्याच्या दाबासह विजेच्या परीक्षेत उत्तीर्ण होतेय मेट्रो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 06:26 AM2019-12-15T06:26:15+5:302019-12-15T06:26:31+5:30

आंध्र प्रदेशातील श्रीसिटीमध्ये निर्मितीचे काम सुरू । एका वर्षात ४०० डबे तयार करण्यावर भर

Electricity with water pressure passes metro | पाण्याच्या दाबासह विजेच्या परीक्षेत उत्तीर्ण होतेय मेट्रो

पाण्याच्या दाबासह विजेच्या परीक्षेत उत्तीर्ण होतेय मेट्रो

googlenewsNext

सचिन लुंगसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नजरेत भरणारी, आतून चकाचक वाटणारी, निसर्गाशी रंगसंगती असलेली, पावसाचा एक थेंबही आत येऊ न देणारी, विजेच्या मदतीने वेगाने धावणारी आणि प्रवाशांना थंडा थंडा कूल कूल अशा वातावरणात नियोजित स्थळी पोहोचविणाऱ्या मेट्रोची निर्मिती सोपी गोष्ट नाही. तिला ऊन, वारा, पावसासह उर्वरित अशा अनेक परीक्षांमधून उत्तीर्ण व्हावे लागते. त्यानंतरच ती ट्रॅकवर धावण्यासाठी सज्ज होते. अशाच काहीशा आठ डब्यांची मुंबई मेट्रो-३ आता आंध्र प्रदेशातील श्रीसिटीमध्ये तयार होत असून, मेट्रोच्या डब्यांची जडणघडण नेमकी कशी होते? याचा हा खास वृत्तांत ‘लोकमत’च्या वाचकांसाठी थेट आंध्र प्रदेशातील श्रीसिटीतूनच.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे काम हाती घेण्यात आले आहे. मेट्रो-३ साठीच्या कोचची निर्मिती आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथील अत्याधुनिक कारखान्यात अल्स्टोम या कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. पाचशेहून अधिक कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत. २०१४ सालापासून येथे विविध मेट्रो प्रकल्पांकरिता काम सुरू आहे.
मेट्रो पूर्णत: आकार घेण्यासाठी तिला तीन टप्प्यांतून जावे लागते
पहिल्या टप्प्यात मेट्रोच्या डब्याचा खालचा भाग (बेस) म्हणजे सांगडा कार्यकुशल कामगारांसमोर ठेवला जातो. खालच्या भागानंतर बाजूच्या दोन्ही भागांचा सांगडा तयार केला होता. तो तयार करत खालच्या भागाच्या दोन्ही बाजूंनी बसविला जातो. याच वेळी डब्याचे छप्परही बसविले जाते.
मग दुसरा टप्पा; या टप्पात बाजूचे दोन्ही भाग कार्बन स्टील, स्टेनलेस स्टीलच्या मदतीने उभे केले जातात. याच वेळी डब्याचा वरचा भागही बसविला जातो. डब्याच्या बाजूचे दोन्ही भाग बसविले जात असतानाच, डब्याची खिडक्या म्हणजे काचा (ग्लास) बसविल्या जातात. हे करतानाच प्रत्येक भाग व्यवस्थित बसला आहे की नाही, याची खातरजमा केली जाते. हे केले जात असतानाच मेट्रोच्या डब्यावर पाण्याचा दाब (वॉटर प्रेशर) मारला जातो. मेट्रो कुठे गळत तर नाही ना? याची तपासणी याद्वारे केली जाते. पाण्याचा दाब एकदाच मारला जात नाही, तर जेव्हा मेट्रोचा डबा अंतिम स्वरूप घेत असतो; तेव्हाही एकदा पाण्याचा दाब मारून मेट्रोच्या डब्याला कुठे गळती तर नाही ना? हेदेखील तपासले जाते.
तिसºया भागात स्टेनलेस स्टीलच्या मदतीने तयार झालेला मेट्रोच्या डब्यातील आतील भाग म्हणजे आसन व्यवस्था, दिवाबत्ती, वीजवाहिन्या; असा प्रत्येक घटक तपासला जातो. याच काळात मेट्रोच्या डब्याची वीज प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. येथील विजेचा दाब सर्वाधिक असल्याने येथे केवळ विजेशी संबंधित कार्यकुशल कामगारांना प्रवेश दिला जातो.

वीज प्रयोगशाळेत डबा उत्तीर्ण झाला की, पुढील टप्प्यात डबा तपासणीसाठी पाठविला जातो. याच काळात रंगसंगती, वीजवाहिनी यंत्रणेसह मेट्रोच्या डब्यातील प्रत्येक घटक सुस्थितीत आहे ना? याची चाचपणी, तपासणी केली जाते आणि अंतिमत: मेट्रोचा डबा तयार झाल्यानंतर तो जहाजमार्गे अथवा किफायतशी मार्गाने प्रकल्पस्थळी पोहचता केला जातो. मेट्रोचा एक डबा तयार करण्यासाठी निश्चित अशी कालमर्यादा नसली, तरी एका वर्षांत ४०० डबे अथवा आॅर्डरनुसार काम केले जाते. मात्र, यात करारानुसार बदल होत असतात.

Web Title: Electricity with water pressure passes metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो