मुंबई - पश्चिम उपनगरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वन हद्दीतील प्रभाग क्र.२५ जानूपाडा,पांडे कंपाउंड़, वैभव नगर कांदिवली ( पूर्व ) आणि प्रभाग क्र.२६ दामूनगर,भीमनगर,आंबेडकर नगर, गौतम नगर कांदिवली ( पूर्व ) येथील नागरिकांना आता कायम स्वरूपी वीज जोडणी ( मीटर ) मिळणार आहे. यामुळे कोरोना काळात या वसाहतीतील सुमारे साडे पाच हजार घरातील २५ हजार नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी याप्रकरणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. या संदर्भात आमदार प्रकाश सुर्वे यांची ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि यांनी अदानीवीज कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर अलिकडेच बैठक झाली होती.त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून मंत्री महोदयांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या येथील वीज ग्राहकांना घरगुती दराने वीज बिल आकारावे असे निर्देश अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे कार्यकारी आधिकारी कपिल शर्मा यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
येथील वसाहतीतील नागरिकांना वनविभागाच्या अडथळ्यामुळे वैयक्तिक घरगुती वीज जोडणी घेता येत नाही. त्यावर तोडगा म्हणून सामायिक मीटरद्वारे वीज पुरवठा होत असल्याने त्यांना स्लॅब रेटचा फायदा होत नाही. त्यामुळे त्यांना वाढीव दराने वीज बिल भरावे लागत असून ते न परवडणारे आहे. सदर वस्ती ही अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील असल्याने त्यांना वाणिज्यिक दराने वीजबिल भरणे कठीण होते यास्तव रहिवासी दराने वीजबिल आकारणी करावी अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंत्री महोदयांबरोबर झालेल्या बैठकीत केली होती.
त्यानंतर नुकतीच कपिल शर्मा यांच्या बरोबर बोरिवली देवीदास लेन येथे आमदार सुर्वे यांच्यासह शिष्टमंडळाची बैठक झाली.यावेळी अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागाठाणे वनविभागाच्या हद्दीत वसलेल्य वीज ग्राहकांना घरगुती दराने वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी लोकमतला दिली.