विद्युतपुरवठा खंडित : डोंबिवलीकर त्रस्त

By admin | Published: June 17, 2014 01:34 AM2014-06-17T01:34:35+5:302014-06-17T01:34:35+5:30

पंधरवड्यापासून डोंबिवली पश्चिमेकडील संतोषीमाता रोडसह कोपर आणि कल्याण ग्रामीणच्या अनेक भागांमध्ये सातत्याने वेळी-अवेळी विद्युतपुरवठा खंडित होत आहे.

Electrification break up: Dombivlikar stroke | विद्युतपुरवठा खंडित : डोंबिवलीकर त्रस्त

विद्युतपुरवठा खंडित : डोंबिवलीकर त्रस्त

Next

डोंबिवली : पंधरवड्यापासून डोंबिवली पश्चिमेकडील संतोषीमाता रोडसह कोपर आणि कल्याण ग्रामीणच्या अनेक भागांमध्ये सातत्याने वेळी-अवेळी विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून हा गोंधळ कशामुळे होत आहे, याचे स्पष्टीकरण महावितरणने द्यावे आणि तातडीने हा त्रास थांबवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
यासंदर्भात सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडे असंख्य तक्रारी आल्याने त्यांनीही महावितरणच्या भोंगळ, मनमानी कारभाराला वैतागून आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिवसातून कधीही आणि कितीही वेळा विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे नियोजन कोलमडत आहे. या परिसरातील सोसायट्यांमध्ये ज्या वेळेत पाणी येते, तेव्हा खालच्या टाक्यांमधील पाणी टेरेसमधील टाक्यांमध्ये वेळेत चढविले जात नाही. परिणामी मुबलक पाणीपुरवठा असूनही पाणीटंचाई होते आहे. दिवसभरात कधीही विद्युतपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार दत्तनगर येथील हेमंत गोलतकर यांनी केली आहे. सोमवारपासून शाळाही सुरू झाल्याने महावितरणच्या या मनमानी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे़ आगामी काळात तसे होऊ नये, यासाठी आणि कोणत्याही वेळांमध्ये विद्युतपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, यासाठी आंदोलन करण्याचा मानस म्हात्रे यांनी व्यक्त केला. दोन दिवसांपासून पावसालाही तुरळक प्रमाणात सुरुवात झाली आहे, त्यामुळे विजेची गरज आहेच़ असे असतानाही हा त्रास का, असा सवाल त्यांनी केला आहे.
महावितरणच्या ज्या काही अडचणी असतील, त्या सर्वात आधी त्यांनी जेथे काम केले जाणार आहे, तेथील नागरिकांना सूचित करावे. मन मानेल तसा कारभार करून जनतेला वेठीस धरू नये, असेही ते म्हणाले. त्यांनी नागरिकांना गृहीत धरून वागू नये, त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये, असा इशाराही दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Electrification break up: Dombivlikar stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.