Join us  

एलिफंटा लेणी परिसरात तडे

By admin | Published: August 09, 2016 2:29 AM

मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी परिसरालगतच्या जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली

उरण : मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी परिसरालगतच्या जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली असून लेण्यांनाही धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिवसेना उपविभाग प्रमुख आणि घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी उरण तहसीलदारांसह पुरातत्व विभागाकडे तक्रार करून पर्यटन क्षेत्रात अपघातासारखी घटना घडण्याआधीच तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जागतिक हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा बेटावरील पुरातन लेण्या पाहण्यासाठी देशी-विदेशी हजारो पर्यटक येत असतात. यामुळे संरक्षक भिंतीलगतच्या जमिनीला भेग पडल्याने भिंत कोसळून लेण्यांनाही धोका पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय अपघाताची शक्यता बळावल्याने लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना धोका पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूस्खलनामुळे रविवारपासूनच संरक्षक भिंतीलगत मोठमोठे तडे जाण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शिवसेना उपविभाग प्रमुख आणि घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी उरण तहसीलदारांसह पुरातत्व विभागाकडे तक्रार करून पर्यटन क्षेत्रात अपघातासारखी घटना घडण्याआधीच तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.बळीराम ठाकूर यांच्या तक्रारीची दखल घेवून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एलिफंटा लेणी परिसराकडे धाव घेतली. मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे एलिफंटा बेटावरील लेण्यांनाच जोडून असलेल्या परिसरातील संरक्षक भिंतीलगत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भूस्खलनामुळे २५ फूट लांब, १० फूट खोल आणि २ फूट खोलीचे मोठमोठे खड्डेही पडले असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे एलिफंटा के व्हजचे केअरटेकर कैलास शिंदे यांनी दिली. मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने रविवारपासूनच लेण्यांच्या संरक्षक भिंतीला तडे जाण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये भूस्खलनाच्या प्रकारात आणखीनच वाढ होत आहे. या गंभीर प्रकरणी वरिष्ठांना माहिती कळविण्यात आली असल्याची माहितीही कैलास शिंदे यांनी दिली. (वार्ताहर)