Join us  

डोंबिवली पूर्वेत एलिव्हेटेड रिक्षा स्टँण्ड!

By admin | Published: June 17, 2014 1:33 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेंतर्गत डोंबिवलीच्या पूर्वेकडील रामनगर भागात ‘एलिव्हेटेड आॅटो स्टॅण्ड’ बांधण्यात येणार आहे.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिकेंतर्गत डोंबिवलीच्या पूर्वेकडील रामनगर भागात ‘एलिव्हेटेड आॅटो स्टॅण्ड’ बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्वेकडील भागात होणारी वाहतूककोंडी नाहीशी होणार असून ३ लाखांहून अधिक डोंबिवलीकरांचा त्रास कमी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजाजी पथ भागातील नगरसेवक मंदार हळबे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प अस्तित्वात येणार आहे. या प्रकल्पाचे स्केच-प्लॅन (आराखडाही) तयार झाला असून त्यास महापालिकेसह मध्य रेल्वेने तात्त्विक मंजुरी दिली असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.या प्रकल्पासाठी अंदाजे २.५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील १ कोटीच्या निधीची तरतूद झाली असल्याचा माहिती हळबे यांनी ‘लोकमत’ला दिली. काम सुरू झाल्यापासून साधारणत: वर्षभरात हे स्टॅण्ड अस्तित्वात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकाच्या मुंबई दिशेच्या बाजूने पूर्वेकडील भागात रामनगर परिसरात स्टॅण्ड बांधण्यात येणार असून येथे केवळ रिक्षा वाहतुुकीलाच प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीसह अन्य वाहनांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या सर्व वाहनांनी या स्टॅण्डच्या खालच्या मोकळ्या जागेत जाऊन तेथूनच प्रवास करणे बंधनकारक आहे. हा प्रकल्प रेल्वेच्या जागेत येत असल्याने त्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा होती़ ती त्यांनी दिली असल्याने आता अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करून बांधकामाच्या निविदा काढण्यासंदर्भातील हालचाली सुरू असल्याचे हळबे यांनी स्पष्ट केले.