Join us

उन्नत मार्गावरील वाहतूक बोगद्यातील गळतीची दुरुस्ती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:08 AM

मुंबई - घाटकोपर ते वाडीबंदरपर्यंतच्या उन्नत मार्गावरून गेल्या सात वर्षांपासून वाहतूक सुरू आहे. या उन्नत मार्गावरील वाहतूक बोगद्यात गेल्या ...

मुंबई - घाटकोपर ते वाडीबंदरपर्यंतच्या उन्नत मार्गावरून गेल्या सात वर्षांपासून वाहतूक सुरू आहे. या उन्नत मार्गावरील वाहतूक बोगद्यात गेल्या काही वर्षांपासून गळती सुरू आहे. त्यामुळे गळती थांबवणे, दुरुस्ती करणे आदी कामे मुंबई महापालिका करणार आहे. या कामाचे सल्लागार म्हणून व्हीजेटीआय या संस्थेला नियुक्त करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल एक महिन्यात तयार केला जाणार आहे.

उन्नत मार्गावर मुंबईतील पहिला वाहतूक बोगदा आहे. या बोगद्यात गेल्या काही वर्षांपासून गळती होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बोगद्यातील गळती रोखणे, रस्त्याचा पृष्ठभाग दुरुस्त करणे, पांजरापोळ येथील खचलेला पोहचमार्ग दुरुस्त करणे आदी कामांसाठी ७३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामाची पूर्वतयारी म्हणून पालिकेने स्थायी तांत्रिक सल्लागारांकडून अभिप्राय घेतला आहे. व्हीजेटीआय संस्थेतील तज्ज्ञ बोगद्यातील गळतीबाबत अभ्यास करणार आहेत. त्यानंतर ही गळती रोखण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत. या सल्ल्यापोटी पालिका संबंधित संस्थेला २३ लाख रुपये देणार आहे.

* सन २०१४ मध्ये सुमारे १६ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग सुरू करण्यात आला. पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईशी जोडणारी ही मिसिंग लिंक होती.

* या मार्गामुळे दीड ते दोन तासांचा प्रवास ३० ते ४० मिनिटांत पूर्ण होतो. हा उन्नत मार्ग थेट मुलूंडपर्यंत नेण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे.

* दक्षिण मुंबईत वाडी बंदरला हा मार्ग संपल्यावर थेट मुख्य टपाल कार्यालयापर्यंतच्या मार्गावर वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल, यावर विचार केला जात आहे.