मुंबई : महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांच्या धरपकडीचे सत्र सुरुच आहे. मुंबईत अवैध वास्तव्यास असलेल्या अकरा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली आणि मालवणी भागातून अवैध वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. आठ जणांना मालवणी परिसरातून तर तिघांना कांदिवलीमधून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केली असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बांगलादेशने बंदी घातलेल्या अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना भविष्यात महाराष्ट्रासह भारतासाठी धोका ठरू शकते, या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशींची धरपकड सुरू केली आहे. पुणे, महाड, अंबरनाथ, पनवेल येथील कारवाईनंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने गेल्या आठवड्यात सुद्धा कांदिवली येथून आठ बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी)च्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याचे उघडकीस आले. या संघटनेचा अल कायदाशी संबंध स्पष्ट होताच बांगलादेश सरकारने दोन वर्षांपूर्वी या संघटनेवर बंदी घातली. बंदीनंतर संघटनेच्या अतिरेक्यांनी रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात विविध ठिकाणी आश्रय घेतल्याचा संशय राज्य दहशतवादविरोधी पथकाला आहे.