अकरा इमारती अतिधोकादायक
By admin | Published: June 2, 2016 02:23 AM2016-06-02T02:23:03+5:302016-06-02T02:23:03+5:30
पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास वित्तहानी आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून म्हाडाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानंतर मुंबई शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादी बुधवारी जाहीर केली.
मुंबई : पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास वित्तहानी आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून म्हाडाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानंतर मुंबई शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादी बुधवारी जाहीर केली.
त्यानुसार, म्हाडाने मुंबई शहरात ११ इमारती अतिधोकादायक असल्याचे म्हटले असून, या इमारतीमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाय संबंधितांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यासह इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी प्रयत्नही करण्यात येणार आहे, असे असा दावाही म्हाडाने केला आहे.
म्हाडा प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी अतिधोकादायक इमारतींबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, मुंबई शहरातील १९ हजार ६४२ उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व पुनर्रचना म्हाडामार्फत करण्यात येते. सद्यस्थितीमध्ये उपकरप्राप्त इमारतींपैकी काही इमारती कोसळल्याने, काही अंत्यत मोडकळीस आल्याने तोडल्यामुळे, काही इमारतींची पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास झाल्याने तसेच काही इमारती उपकरातून वगळण्यात आल्याने प्रत्यक्षात उपकर प्राप्त इमारतींची संख्या १४ हजार ३७५ एवढी आहे. दरवर्षी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार मंडळाने केलेल्या सर्व्हेक्षणांती ११ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे. अकरा अतिधोकादायक इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे. त्या अतिधोकादायक इमारतींमध्ये ३७९ निवासी, ३१० अनिवासी असे एकूण ६८९ रहिवासी वास्त्यव्य करत आहेत. या इमारतींपैकी ३ इमारतींना पुनर्विकासासाठीचे ना हरकरत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
या इमारतीमधील ७६ निवासी, ४६ अनिवासी अशा एकूण १२२ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची आहे. ३०३ रहिवाशांपैकी ६ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित २८२ रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्थाकरावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींवर, ती इमारत अतिधोकादायक असल्याचा सूचना फलक लावण्यात येतो.
अतिधोकादायक भागाला व आवश्यकतेनुसार इतर भागाला टेकू लावण्यात येतो.
इमारतींची अतिधोकादायक स्थिती विचारात घेऊन इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यात येतो.
इमारतींमधील अतिधोकादायक भागाची दुरुस्ती केली जाते.
रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करत धोकादायक भागाची दुरुस्ती केली जाते.
या संदर्भात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
इमारतीच्या अतिधोकादायक भागाचा वापर त्वरित थांबवावा. घर रिकामे करण्याची नोटीस बजावल्यानंतर घर त्वरित रिकामे करावे. धोकादायक इमारतीमध्ये राहू नये.
संक्रमण शिबिरात निवासस्थान मिळण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात अर्ज करावा. जेणेकरून घर उपलब्ध करून देण्यात येईल.सुरक्षेचा उपाय म्हणून म्हाडाच्या कार्यवाहीवेळी सहकार्य करावे.
इमारतींना तडे जाणे, माती पडू लागणे, भिंतीच्या भेगा रुंद होणे, इमारतीचा कुठलाही भाग खचणे, जमिनीपासून भिंत अलग होणे अशी लक्षणे निदर्शनास आल्यास याची माहिती मुंबई महापालिका, म्हाडा आणि अग्निशमन दलास द्यावी.