‘मुस्कान ऑपरेशन’मध्ये अपहृत अकरा मुले सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:58 AM2018-12-19T04:58:59+5:302018-12-19T04:59:35+5:30
पोलिसांची कामगिरी : चार ते दहा वर्षीय मुलांचा समावेश; कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान
नवी मुंबई : हरवलेल्या व अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी राबवल्या जात असलेल्या ‘मुस्कान आॅपरेशन’अंतर्गत अकरा बालकांचा पोलिसांनी शोध लावला आहे. त्यामध्ये चार बालकांना फूस लावून पळवण्यात आले होते, तर सात बालके रस्ता चुकल्याने कुटुंबापासून दुरावली होती.
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अकरा मुलांचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. ज्या हरवलेल्या मुलांचा अद्याप तपास लागलेला नाही, त्यांचा नव्याने तपास सुरू केला होता. यादरम्यान बेलापूर, उलवे, नेरुळ व करावे येथून बेपत्ता असलेल्या चौघा बालकांचा शोध लागला आहे. त्यामध्ये एक मुलगा तर तीन मुलींचा समावेश असून त्या सर्वांना फूस लावून पळवून नेण्यात आले होते. यानुसार त्यांची रत्नागिरी, उलवे, नेरुळ तसेच खारघर परिसरातून सुटका करण्यात आली आहे. याचदरम्यान बेलापूर, जुईनगर, सानपाडा रेल्वेस्थानक परिसरात सात बालके एकटी आढळून आली होती. ४ ते १० वयाची ही बालके नकळतपणे घरच्यांपासून दुरावली होती. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात वावरताना ती पोलिसांना आढळली होती. त्यापैकी दोघे जण फिरण्यासाठी घराबाहेर निघाली असता चुकली होती.
गुन्हे शाखा पोलिसांनी या सर्वांकडून राहण्याच्या ठिकाणाची माहिती मिळवून त्यांच्या पालकांचा शोध घेतला. तसेच त्यांचीच ही बालके असल्याची खात्री पटवून त्यांच्या ताब्यात दिली. उपआयुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, ज्योती सूर्यवंशी आदींच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. त्यांच्यामुळे अकरा बालकांचा शोध लागला असून त्यांना फूस लावून पळवणाºयांनाही अटक करण्यात आली आहे.