अकरावी प्रवेशाच्या जागा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:49 AM2018-05-23T00:49:58+5:302018-05-23T00:49:58+5:30

१४ नवीन महाविद्यालये : गेल्या वर्षीपेक्षा ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाइन प्रवेश

Eleven entrance seats increased | अकरावी प्रवेशाच्या जागा वाढल्या

अकरावी प्रवेशाच्या जागा वाढल्या

googlenewsNext

मुंबई : दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली असून, शिक्षण उपसंचालक विभागाकडून अकरावीसाठी उपलब्ध जागाही जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा आॅनलाइन प्रवेशाच्या ४ हजार २६४ जागा वाढल्या आहेत. यंदा मुंबई विभागात सर्व शाखा आणि कोट्याच्या मिळून ३ लाख १ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. यंदा १४ नवीन महाविद्यालयांना मिळालेल्या मान्यतेमुळे प्रवेश क्षमतेमध्ये एकूण ९,६७० जागांची वाढ झाली आहे. यंदा अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी महाविद्यालयांची संख्या ८०० इतकी आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही कॉमर्सच्या जागा सर्वाधिक म्हणजे १,६५,३३० इतक्या आहेत. यामध्ये मागील वर्षीपेक्षा ४ हजार ४६० जागांची यंदा वाढ झाली आहे. कला शाखेच्या ३५ हजार ३२० जागा उपलब्ध असून, त्यात केवळ १ हजार १४० जागांची वाढ झाली आहे.

विज्ञान शाखेत यंदा ३ हजार ७६० जागा वाढल्या असून, त्यांची संख्या ९४,७७० इतकी आहे. दरम्यान, अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीला मुंबईतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. यंदा मुंबई, रायगड, ठाणे मधून १४ नवीन कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने, या वर्षी अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या एकूण जागांमध्ये वाढ झाली आहे. जागांची ही वाढ ४ हजार २६४ इतकी आहे.

 

Web Title: Eleven entrance seats increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.