लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशांवर लक्ष ठेवण्यासाठी गठीत करण्यात येणारी शिक्षक, प्राचार्यांची समिती यंदा बरखास्त करण्यात आली. यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या हातात आली असून, त्यावर कोणाचेच नियंत्रण न राहिल्याने प्रवेशप्रक्रियेत गोंधळ निर्माण झाल आणि तिसऱ्या फेरीनंतरही बहुतांश विद्यार्थी प्रवेशनिश्चितीपासून वंचित राहिले. अकरावी प्रवेशप्रक्रियेत भ्रष्टाचार व चुका होण्याची शक्यता लक्षात घेता, ही समिती तातडीने गठीत करावी, अशी मागणी माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली.
अकरावी प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर लगेचच सुरू केली असती, तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही आरक्षणानुसार प्रवेश मिळून आरक्षणावर स्थगिती येईपर्यंत आपली प्रक्रिया पूर्ण करता आली असती. या शासन दिरंगाईचा फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसल्याचा आरोप शेलार यांनी केला. अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी पार पडूनही अद्याप बहुतांश विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. अकरावी प्रवेशाचा गोंधळ दूर करून विद्यार्थी, पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली आहे. आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एखाद्या समितीमार्फत संपूर्ण अकरावी प्रवेश प्रक्रियेचे पुनरावलाेकन करून यातील दोष दूर करावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
..............................