रिपब्लिकन ऐक्यासाठी अकरा सदस्यीय समिती
By admin | Published: May 2, 2017 05:06 AM2017-05-02T05:06:24+5:302017-05-02T05:06:24+5:30
रिपब्लिकन ऐक्य टिकविण्यासाठी अकरा सदस्यीय समितीची स्थापना मुंबई विद्यापीठाच्या जे. पी. नाईक भवन येथे झालेल्या
मुंबई : रिपब्लिकन ऐक्य टिकविण्यासाठी अकरा सदस्यीय समितीची स्थापना मुंबई विद्यापीठाच्या जे. पी. नाईक भवन येथे झालेल्या चर्चासत्रामध्ये करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावने यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित हे चर्चासत्र पार पडले. रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार केलेल्या समितीत राजकीय नेत्यांना बगल देण्यात आली असली, तरी रिपब्लिकन चळवळीत मोलाचा वाटा असलेल्या आंबेडकर कुटुंबाने या चर्चासत्राकडे कानाडोळा केला आहे.
दरम्यान, रिपाइं ऐक्याचे अध्यक्षपद बौद्धेतर समाजाच्या नेतृत्वास द्यावे, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ते म्हणाले, देशात अनेक दलित संघटना व गट आहेत. ते एकाच कोणत्या तरी पक्षात विलीन करायचे की सर्वांना एकत्र घेवून नव्या पक्षाची स्थापना करायची, यासाठी समिती प्रयत्न करेल. पक्ष, रिपब्लिकन ऐक्य, दलित एकीकरण यावर पुढील दोन महिन्यांमध्ये समिती अहवाल तयार करेल, त्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल.
पानतावने म्हणाले की, या समितीमध्ये कोणताही राजकीय नेता नसेल. समितीने अहवालात नेमके काय सादर करायचे, याचा सूचनाही त्यांनी केल्या. या चर्चासत्रात दलित समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषयावर चर्चा झाली. यावेळी उपस्थित दलित समाजातील लेखक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, नेत्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. दलित मतांच्या विभाजनामुळे समाजाचे नुकसान होत असल्याने होवू नये म्हणून काय करता येईल, याचा अभ्यास समिती करेल. इतर समाजाच्या लोकांना ऐक्यामध्ये सामील करण्यासाठी समितीने अभ्यास करावा, अशी मागणी यावेळी मान्यवरांनी केली. (प्रतिनिधी)
समावेश नाही
ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे, सुनील खोब्रागडे, वैभव छाया, प्रा. विजय खरे, डॉ संगीता पवार, अशोक कांबळे, डॉ. बी. बी. मेश्राम, मंगेश बनसोडे, डॉ. जी.के. डोंगरगावकर, प्रा. जी. पी. जोगदंड या आंबेडकरी विचारवंतांचा ११ सदस्यीय समितीमध्ये समावेश आहे. मात्र चर्चासत्र आणि समितीमध्ये कुठेही आंबेडकर कुटुंबातील एकाही व्यक्तीचा समावेश नसल्याची चर्चा यावेळी उपस्थितांत होती.