अकरावी आॅनलाइन : पहिल्या दिवशी ३,२४० अर्ज
By admin | Published: June 3, 2017 05:26 AM2017-06-03T05:26:12+5:302017-06-03T05:26:12+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला. शुक्रवारी सुरू झालेल्या आॅनलाइन प्रक्रियेत ३ हजार २४० विद्यार्थ्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला. शुक्रवारी सुरू झालेल्या आॅनलाइन प्रक्रियेत ३ हजार २४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
गेल्या वर्षीपासून अकरावीचे प्रवेश पूर्णत: आॅनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले. आॅनलाइन अर्ज भरताना, विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे अर्ज भरावयाचे असतात. पहिला अर्ज प्राथमिक माहितीचा असून, निकालाआधी विद्यार्थी हा अर्ज भरू शकतात. गेल्या वर्षी ही प्रक्रिया मे महिन्यात सुरू झाली होती. यंदा जून उजाडल्यानंतर प्रक्रिया सुरू झाल्याने, पालक चिंतेत होते. आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी पहिल्या दिवशी फक्त ३ हजार २४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी ३८ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, ३ हजार २०२ अर्जांची पडताळणी बाकी असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती मिळालेली नाही. त्यामुळे शाळांमध्ये पहिल्या दिवशी कमी विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी आले होते. या प्रक्रियेत कोणताही अडथळा आलेला नाही. आता जास्त विद्यार्थी आल्यावर प्रक्रिया सुरळीतपणे पार पडते का नाही, हे पाहावे लागेल, असे मत शाळांच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे.
पुस्तिकेच्या वाढीव किमतीमुळे पालक, मुख्याध्यापक नाराज
आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज व माहिती पुस्तिका घेणे बंधनकारक असते. गेल्या वर्षी या पुस्तिकेची किंमत १५० रुपये होती. यंदा या किमतीत तब्बल १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यंदा पुस्तिकेची किंमत २५० रुपये ठेवण्यात आली आहे. १०० रुपयांची वाढ केल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पैसे वाढवण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुसरीकडे शाळांना आधी पैसे भरून, मग पुस्तके विकत घ्यायला सांगितल्याने शाळा चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येइतक्या पुस्तिका विकत घेण्यासाठी इतके पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. त्यामुळे या नव्या प्रक्रियेसंदर्भात मुख्याध्यापक नाराज असून, शिक्षणमंत्र्यांना पत्र देणार आहेत.