Join us

अकरावी आॅनलाइन प्रवेश; दुसऱ्या कट आॅफची उत्सुकता

By admin | Published: June 29, 2015 2:58 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी कट आॅफ लिस्ट मंगळवारी जाहीर होणार असून, ती कितीवर स्थिरावणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी कट आॅफ लिस्ट मंगळवारी जाहीर होणार असून, ती कितीवर स्थिरावणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.अकरावी आॅनलाइनसाठी एकूण २ लाख ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. २२ जून रोजी अकरावीची पहिली कट आॅफ जाहीर झाली. त्यात १ लाख ८८ हजार १५८ विद्यार्थ्यांची पहिल्याच कट आॅफमध्ये वर्णी लागली होती. मात्र त्यांपैकी केवळ ५० हजार ८८८ विद्यार्थ्यांना आवडीचे कॉलेज मिळाले होते. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करून बेटरमेंट नियमानुसार दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार होती. त्यामुळे आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दुसऱ्या यादीची प्रतीक्षा आहे.पहिल्या यादीत नावच आले नसलेल्या १२ हजार ४९१ विद्यार्थ्यांना किमान प्रवेश मिळवण्यासाठी दुसऱ्या यादीची उत्सुकता आहेच. पहिल्या कट आॅफमध्ये नाव आल्यानंतरही कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केले नसल्याने ६९ हजार ५२७ विद्यार्थी आॅनलाइन प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. परिणामी, त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर पहिल्या कट आॅफमध्ये आवडते कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटच्या पर्यायाने प्रवेश मिळू शकतो. शिवाय पहिल्या कट आॅफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कट आॅफमध्ये नाव आल्यावर प्रवेश निश्चित करण्याची उत्सुकता आहे.दरम्यान, यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ हजारांवर गेली आहे. परिणामी, बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण असतानाही पहिल्या कट आॅफमध्ये आवडीचे कॉलेज मिळाले नाही. त्यामुळे दुसऱ्या कट आॅफनंतर तरी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्ससाठी मुंबईतील टॉप ५ कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का, असा प्रश्न त्यांना आहे.