लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. प्रवेशाच्या जागा ऑनलाइन भरल्या जात असताना कोटा प्रवेशाच्या जागा ऑफलाइन पद्धतीने का भरल्या जात आहेत, असा प्रश्न सिस्कॉम संघटनेने उपस्थित केला आहे. अकरावी प्रवेशात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश सुरू आहे. कोटा पद्धतीच्या प्रवेशांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप सिस्कॉमच्या संचालिका वैशाली बाफना यांनी केला आहे.
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या शेवटी मुंबई विभागात २१ हजार ८८९ तर आणि पुणे विभागात ६ हजार १४१ प्रवेश कोट्यातून झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. ऑफलाइन पद्धतीने होत असलेले हे कोटा प्रवेश गुणवत्ता डावलून होत असून, यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान शिक्षण विभागाकडून केले जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.
प्रवेशफेऱ्या दरम्यान कोणतेही नवीन अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना परवानगी नसते. मग पहिली फेरी सुरू होण्याच्या आधी असलेली अर्ज संख्या आणि प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी असलेली अर्जसंख्या वाढली कशी, तसेच समितीमार्फत झालेले प्रवेश आणि प्रत्यक्ष संकेतस्थळावर दिसत असलेले प्रवेश यांत तफावत कशी, असा प्रश्न वैशाली बाफना यांनी उपस्थित केला आहे.
प्रवेश समिती विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक कोट्यांतर्गत प्रवेश घेण्यास भाग पाडत आहे का, असाही सवाल त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. यंदा ऑफलाइन पद्धतीने होत असलेल्या कोट्यातील प्रवेशांना कोणती गुणवत्ता यादी होते, हे प्रवेश गुणवंत विद्यार्थ्यांना न डावलता होत आहेत का, याची माहिती शिक्षण विभागाने प्रसिद्ध करावी, अशी मागणी बाफना यांनी केली आहे.
-----
ऑनलाइन प्रवेश- असे वाढले अर्ज
मुंबई
२८ ऑगस्ट रोजी आलेले अर्ज – २,०५,७६०
३१ ऑगस्ट रोजी दिसत असलेले अर्ज– २,३०,४७७
दोन्हीतील फरक - ८,२७६
--
प्रवेशसमिती मार्फत झालेले प्रवेश -५८,५०६
३१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष दाखविलेले प्रवेश - ७३,३०१
दोन्हीतील फरक -१४,७९५
---
पुणे
२८ऑगस्ट रोजी आलेले अर्ज -६२,३७९
३१ ऑगस्ट रोजी दिसत असलेले अर्ज - ७२,९४४
दोन्हीतील फरक -१,६३४
--
समिती मार्फत झालेले प्रवेश - २४,६७५
३१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष दाखविलेले प्रवेश-२६,३५२
दोन्हीतील फरक -१,६७७