अकरावी प्रवेशाची पद्धत अद्याप अंतिम नाही, पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:33 AM2021-05-23T07:33:59+5:302021-05-23T07:35:20+5:30

Education News: पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. उर्वरित राज्यात ते स्थानिक पातळीवरून केले जातात. यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. 

Eleventh admission method is not final yet, parents, students should not be misled! | अकरावी प्रवेशाची पद्धत अद्याप अंतिम नाही, पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल नको!

अकरावी प्रवेशाची पद्धत अद्याप अंतिम नाही, पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल नको!

Next

मुंबई : दहावी परीक्षा रद्दच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे निकालासाठी कोणती पद्धत अवलंबवावी? अकरावी प्रवेश कोणत्या पद्धतीनुसार करावेत ? याबाबत शिक्षण विभागाची चाचपणी सुरू आहे. तरीही राज्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याची दखल घेत, ‘राज्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करून पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये’, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या. यासंबंधीचे पत्रक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.

पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. उर्वरित राज्यात ते स्थानिक पातळीवरून केले जातात. यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. 

त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना निकाल दिला जाईल, असे गृहीत धरून राज्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवेशासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. याची माहिती मिळताच ही प्रवेश प्रक्रिया बंद करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या.

दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची की नाही, यासंदर्भात शिक्षण विभागाने सर्वेक्षण हाती घेतले असून त्यानुसार विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाहीची पद्धत कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांना कळविली जाईल. त्या पद्धतीनुसारच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात काहीच निर्णय झाला नसल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांनी सूचनांची वाट पाहावी, विद्यार्थी, पालकांना गोंधळात टाकू नये, असे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. 

शासन आदेश आल्यानंतरच पुढील कार्यवाही
राज्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर शासन आदेश आल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. मात्र, तत्पूर्वी कोणत्याही महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये. विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होईल, अशा कोणत्याही सूचना देऊ नयेत.
- दत्तात्रय जगताप, शिक्षण संचालक, 
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय

Web Title: Eleventh admission method is not final yet, parents, students should not be misled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.