अकरावी प्रवेश: यादीत नाव येऊनही 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 01:29 PM2021-09-01T13:29:41+5:302021-09-01T13:30:02+5:30
अपसंतीचे महाविद्यालय मिळूनही ११ हजार विद्यार्थ्यांनी घेतले नाहीत प्रवेश
मुंबई : मुंबई विभागातून अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले होते; मात्र त्यापैकी ५९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांत प्रवेशच घेतले नाही. केवळ ५८ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेशाची टक्केवारी पाहता ती केवळ ५० टक्के आहे. यासोबत तब्बल १० हजार ७१५ विद्यार्थ्यांनी त्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी विशेष फेरीची वाट पहावी लागणार आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर झाली आणि त्यात ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट करण्यात आले; मात्र पहिल्या फेरीअखेर केवळ ३८ हजार ०३६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. या प्रवेश न घेतलेल्या २२ टक्के म्हणजे १० हजार ५१५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी रिपोर्टच न केल्याची माहिती आहे, तर १७४ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले असून, ६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत.
पहिल्या फेरीत मुंबई विभागातून १,९७,१७१ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी १,१७,८८३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते. जात व एनसीएल प्रमाणपत्राअभावी प्रवेशात अडचणी येत असल्याने प्रवेशासाठी शिक्षण संचलनालयाकडून एका दिवसाची मुदतवाढही देण्यात आली. तरीही अखेरच्या दिवशी केवळ ५८ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
४ सप्टेंबर रोजी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपासून पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. २ सप्टेंबरपर्यंत याची मुदत असून, विद्यार्थ्यांनी आधीच्या फेरीचा महाविद्यालयांचा कटऑफ पाहूनच पसंतीक्रम भरावेत, अशा सूचना प्राचार्य आणि तज्ज्ञ देत आहेत.
- पहिल्या फेरीसाठी एकूण उपलब्ध जागा - १,९७,१७१
- पहिल्या गुणवत्ता यादीसाठी एकूण पात्र विद्यार्थी- १,९१,०९३
- पहिल्या फेरीत जागा अलॉट झालेले विद्यार्थी- १,१७,८८३
- पहिल्या फेरीअखेर प्रवेशित विद्यार्थी - ५७, ५८०
- पहिल्या पसंतीक्रम प्रवेशित विद्यार्थी - ३७, ५८९