अकरावी प्रवेश प्रक्रिया : बायफोकलच्या पहिल्या यादीत ८७६५ विद्यार्थी ठरले पात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 06:51 AM2019-06-26T06:51:19+5:302019-06-26T06:51:33+5:30
अकरावी बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी यंदा २८ हजार ६४४ जागा उपलब्ध असून, पहिल्या फेरीसाठी १४ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते.
मुंबई : अकरावी बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी यंदा २८ हजार ६४४ जागा उपलब्ध असून, पहिल्या फेरीसाठी १४ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. पैकी ८ हजार ७६५ विद्यार्थी पहिल्या फेरीत प्रवेशास पात्र ठरले आहेत. यामध्ये पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळणाऱ्याची संख्या ४ हजार ३३४ इतकी आहे.
अकरावी प्रवेशातील बायफोकल विषयाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची पहिली यादी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर होणार होती. मात्र, उपसंचालक कार्यालयाकडून त्याची माहिती देण्यास उशीर झाला. यात शाखानिहाय बायफोकल विद्यार्थ्यांपैकी कला शाखेतील विद्यार्थ्यांना ९, वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना ३२४ तर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ८,४३२ जागा अलॉट झाल्या. बायफोकलच्या यादीत राज्यमंडळाच्या १०,२६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले, त्यापैकी ६,३६३ विद्यार्थ्यांना, तर इतर मंडळाच्या ४,२२० पैकी २,४०२ जणांना अलॉटमेंट मिळाली.
बायफोकल प्रवेशप्रक्रियेत तब्बल ४ हजार ३३४ पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहेत.१ जुलैला अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
दरम्यान, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, तर कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसायिक शिक्षणासाठी किती जागा आहेत, कोट्यातील जागा किती आदी माहिती उपसंचालक कार्यालयाकडे नसून ती जाहीर करण्यात आली नाही.
माहिती उपलब्ध नाही
अकरावी बायफोकलची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तर अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या कला, वाणिज्य, विज्ञान त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणासाठी किती जागा आहेत. कोट्यातील जागांची संख्या किती? किती महाविद्यालयांत किती जागा वाढल्या यासंबंधी माहिती उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नसून ती जाहीर करण्यात आली नाही.