मुंबई : बुधवारपासून अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यंदाच्या वर्षासाठी प्रवेशात विज्ञान शाखेच्या जागांमध्ये ५ टक्के, तर कला व वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशासाठी ६,६२२ जागांची वाढ प्रस्तावित असून, ही वाढ सध्या शहरांतील ९८ महाविद्यालयांत प्रस्तावित आहे. मागील वर्षी ८० ते ८५ टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांचा ज्या महाविद्यालयांकडे जास्तीतजास्त ओढा होता, अशा महाविद्यालयांत ही जागावाढ प्रस्तावित आहे. यासंबंधी महाविद्यालयांना लवकरच पत्र पाठविण्याची कार्यवाही उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अकरावीच्या जागावाढीचा फायदा नेमका कोणाला होणार, असा सवाल काही शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.नवीन शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार आता महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी जागावाढ करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा मिळणार नसल्याची प्रतिक्रिया शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली. प्रस्तावित जागावाढ केलेली बहुतेक महाविद्यालये नामांकित असून, यामध्ये इतर मंडळाच्याच विद्यार्थ्यांना त्यांचे गुण जास्त असल्याने प्रवेश मिळणार आहे आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची पीछेहाट होऊन, त्यांना विनाअनुदानित महाविद्यालयांतच प्रवेश घ्यावा लागणार, असे मत त्यांनी व्यक्त केले. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात सरकारने कोटा ठरवून देणे आवश्यक होते. जागावाढीच्या निर्णयाने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मागील वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्रवेशित झालेल्या इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार ६६१ इतकी होती, तर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख १२ हजार ९४५ इतकी होती. म्हणजेच अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.९४ तर ८.०२७ इतकी होती. यावरून शालेय शिक्षणमंत्री आणि अधिकारी, महत्त्वाच्या महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यात बैठक होऊन यंदाच्या अकरावीच्या जागांमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. जागावाढ करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये डहाणूकर, मिठीबाई , ठाकूर, आरडी नॅशनल महाविद्यालय , साठ्ये, चेतना , केसी , एचआर, सेंट झेविअर्स भाऊसाहेब हिरे अशा एकूण ९८ महाविद्यालयांचा समावेश आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे आंदोलनअकरावीच्या जागावाढीमुळे विद्यार्थ्यांचे तर नुकसान होणारच आहे. मात्र, यामुळे शिक्षकांचाही भार वाढणार असून, ते अतिरिक्त होण्याची भीतीही मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष एस. एल. दीक्षित यांनी व्यक्त केली. नामांकित महाविद्यालयातील जागावाढीमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ओढा साहजिकच कमी होईल. एका वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सरासरी १०० विद्यार्थी जरी कमी झाले, तरी एकदम ८० तुकड्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे साहजिकच हजारो शिक्षकही अतिरिक्त होऊ शकतात. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या नोकरीवर यामुळे गंडांतर येणार असल्याने, बुधवारी त्यांनी उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले, तसेच यासंबंधी उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना निवेदन देऊन ही जागावाढ रद्द करण्याची मागणी केली.
अकरावी प्रवेश प्रक्रिया: ९८ महाविद्यालयांत जागा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 4:39 AM