अकरावी प्रवेश प्रक्रिया; प्रथम सत्र संपत आले, तरी हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:22 AM2019-10-03T06:22:45+5:302019-10-03T06:23:37+5:30
अकरावी प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेली तिसरी प्राधान्य फेरी संपली तरी अद्याप अंतिम रिक्त जागांची यादी उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेली तिसरी प्राधान्य फेरी संपली तरी अद्याप अंतिम रिक्त जागांची यादी उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सात फेऱ्या संपल्या तरी हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून रोज उपसंचालक कार्यालयाच्या फेºया मारत असल्याचे चित्र आहे. अकरावीच्या शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपत आले तरी अद्याप ८० ते ९० हजारांहून अधिक प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.
प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार विद्यार्थी करीत आहेत. अद्याप दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी आणि एटीकेटी सवलत मिळालेले अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा गणेशोत्सव संपला तरी प्रवेश प्रक्रिया संपलेली नाही. त्यामुळे प्रथम सत्र प्रवेश प्रक्रियेतच संपले असून, उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच प्रवेश न मिळाल्यामुळे तणाव आहे त्यातच प्रवेश मिळाल्यानंतर अनेक महाविद्यालयांमध्ये प्रथम सत्राचा बराचसा अभ्यासक्रम संपल्यामुळे तो अभ्यास घरीच बसून करावा लागेल, अशी भीती प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या या विद्यार्थ्यांना सतावत आहे.
दरम्यान, रिक्त जागा आणि विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो, अशी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी प्रवेश समितीकडून आवश्यक तितक्या प्रवेश फेºयादेखील राबविण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी हजारो विद्यार्थी अजूनही प्रवेशासाठी ताटकळल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.
अभ्यास करायचा कसा? विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह
अकरावी प्रवेशाच्या यंदा तीन नियमित फेºया, एक विशेष फेरी आणि तीन प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य अशा एकूण सात फेºया पार पडल्या. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून २ लाख ४२ हजार १४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील काहींनी आयटीआय किंवा डिप्लोमाला प्रवेश घेतला. तरीही उपसंचालक कार्यालय व मार्गदर्शन केंद्रांमध्ये आजही अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी फेºया मारत आहेत. त्यातच अकरावीचे प्रथम सत्र संपत आल्यामुळे प्रवेश मिळणार कधी आणि अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. उशिरा मिळणाºया प्रवेशामुळे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.