मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर होणार होती; मात्र, मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने यासंदर्भातील सर्व कार्यवाही शिक्षण संचालनालयाकडून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
एसईबीसी आरक्षणाला ही स्थगिती मिळून एकूण प्रवेशाच्या जागांवर याचा परिणाम होऊन आपली प्रवेशाची संधी हुकणार का? अशी भीती विद्यार्थी-पालकांना वाटू लागली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण उपलब्ध जागांपैकी १२ टक्के जागांवर एसईबीसी आरक्षण लागू आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत मुंबई विभागात ७८ हजार ६१० विद्यार्थ्यांनी तर राज्यात १ लाख १६ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
यंदा दहावीचा निकाल मागील काही वर्षांतील सर्वाधिक असल्यामुळे अकरावी प्रवेशामध्येही चढाओढ पाहण्यास मिळत आहे. उत्तम गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आता दुसऱ्या नियमित फेरीसाठी आरक्षणाच्या कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची जुळवाजुळव करीत पुन्हा अर्ज दुरुस्ती नोंदविल्या आहेत.
मुंबई विभागात एसईबीसीअंतर्गत अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी १७ हजार ८४४ जागा उपलब्ध आहेत. मात्र पहिल्या फेरीसाठी केवळ २९२३ विद्यार्थ्यांनीच या जागांसाठी अर्ज सादर केले होते. दुसºया नियमित फेरीसाठी या जागांसाठीच्या अर्जांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयामुळे आता विद्यार्थी - पालकांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांचा काळ सुरू असताना शिक्षण विभागाने लवकर यासंदर्भातील संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थी - पालकांमधून होत आहे.