Join us

अकरावी प्रवेश प्रक्रिया, पहिल्याच दिवशी १३१९ अर्जांची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 6:15 AM

संकेतस्थळाचे शिक्षणमंत्र्यांकडून अनावरण

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा भाग १ भरण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सायंकाळी ७ पर्यंत १ लाख ९२ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील १६७९ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग १ भरून अर्ज लॉक केला तर १३१९ जणांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती संकेतस्थळावरून मिळाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावी नोंदणी ते अर्जाचा पहिला भाग भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, माहिती भरून अर्ज लॉक करणे, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे, प्रवेश निश्चित करणे या प्रकारच्या सर्व प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीनेच संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना पार पाडता येतील. त्यासाठीच्या संकेतस्थळाचे अनावरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. संकेतस्थळावरील सुविधांमधील ‘नो युअर एलिजिबिलिटी’चा पर्याय विद्यार्थ्यांना यंदा देण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी आपले गुण, इतर आवश्यक माहिती भरून प्राधान्यक्रम असणाऱ्या महाविद्यालयांच्या मागील वर्षाच्या ‘कट आॅफ’चा अंदाज घेऊ शकतील. यंदा आयसीएसई आणि आयजीएसई, आयबीसारख्या मंडळांच्या श्रेण्यांचे रूपांतर गुणांत करण्याची सोयही आॅनलाइन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाºया अडचणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना हमीपत्र सादर करून प्रमाणपत्रे देण्यासाठी ३ महिन्यांची मुदत मिळेल, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.मोबाइल अ‍ॅपची प्रतीक्षासंकेस्थळासोबतच अकरावी प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची सोय शिक्षण विभाग करणार आहे. मात्र त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. मोबाइल अ‍ॅपची प्ले स्टोअरवरील नोंदणीची प्रक्रिया सुरू असून अर्जाचा भाग २ भरेपर्यंत ते उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती एससीईआरटीने (महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) दिली.

टॅग्स :महाविद्यालय