अकरावीचे प्रवेश यंदा स्थानिक पातळीवर मेरीटनुसार करावेत ... !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:39 PM2020-05-02T18:39:01+5:302020-05-02T18:40:26+5:30
तसेच पूर्ण वेळ शालेय शिक्षण देणाऱ्या वाहिनीची गरज असल्याचे शिक्षकांचे मत
मुंबई : यंदा राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले असून दहावीच्या बारावीच्या निकालाना तर उशीर होणारच आहे पण त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेला लेटमार्क लागणार आहे. आधीच दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सुरु असते यंदा आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत यंदा याद्यांचे घोळ रद्द करून केवळ स्थानिक पातळीवर मेरीटनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी. यामुळे पुढच्या शैक्षणिक वर्षातील अनावश्यक विलंब टळू शकेल अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली. सरकारने विद्यार्थ्यांसाठी लर्निंग फ्रॉम होमची संकल्पना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आपले शैक्षणिक धोरण ही जाहीर करावे यासाठी नरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई मेल करून मागणी केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाचा बाऊ करण्याची गरज नाही कारण यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जात आहे. दूरदर्शनसारख्या वाहिनीवर ही विद्यार्थ्यांना काही वेळ शिक्षण मिळत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.आजच्या काळात पूर्ण वेळ शालेय शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक वाहिनीची आवश्यकता असल्याचे मत शिक्षक व शिक्षक संघटना व्यक्त करीत आहेत. शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ही याच उपयोग होऊ शकतो.यासाठी सरकारने तातडीने पावले उचलत शैक्षणिक चॅनेल सुरु करावी, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी, मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनीही केली आहे.
लॉकडाऊन नंतर काय उपाययोजना करणार
लर्निंग फ्रॉम होमच्या माध्यमातून सध्यस्थितीत विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरु आहे. मात्र लॉकडाऊन उठल्यानंतर शाळा आणि त्यांचे नियोजन कसे असणार याबाबत शालेय शिक्षण विभागाने धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे असे मत नरे यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोशल डिस्टंसिन्ग ठेवून शाळा कशा चालवायची ? घर ते शाळा असा विद्यार्थ्यांचा प्रवास कसा असणार ? वर्गात अध्यन व अध्यापन प्रक्रिया कशी पार पाडायची? याचे दिर्घकालिन नियोजन व धोरण विभागाने आत्तापासूनच करायला हवे. विद्यार्थ्यांची आरोग्याची सुरक्षा व नव्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन यावर शासकीय पातळीवर हालचाली होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.