अकरावी प्रवेश: आजपासून तिसरी फेरी; अडीच लाख जागा रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 06:36 AM2023-07-06T06:36:33+5:302023-07-06T06:36:47+5:30
परिणामी, प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी असल्याने रिक्त जागांचा प्रश्न ऐरणीवर आहे.
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी बुधवारी समाप्त झाली. मुदतीअखेरीस केवळ ३८.३३ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, तर सुमारे १ लाख ६७ हजार १२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर मुंबई विभागात जवळपास २ लाख ७७ हजार ५४४ जागा रिक्त राहिल्या आहेत. गुरुवार, ६ जुलैपासून तिसऱ्या फेरीला सुरुवात होत असून ही नोंदणी प्रक्रिया ९ जुलैपर्यंत चालेल.
अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत दुसऱ्या यादीनंतर १ लाख ६१ हजार ७२० विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ७५ हजार ८९६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.
परिणामी, प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी असल्याने रिक्त जागांचा प्रश्न ऐरणीवर आहे. ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी १ लाख ५८ हजार ४५७ जागा रिक्त आहेत. दरम्यान, प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी ९ जुलैपर्यंत मुदत आहे. १० जुलै रोजी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून त्याचे कॅप समित्यांकडून पूर्व परीक्षण होईल. १२ जुलै रोजी कट ऑफ यादी जाहीर होईल. त्यानंतर अलाॅट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर विद्यार्थ्यांना पुढील फेरीची वाट पाहावी लागणार आहे. १४ जुलै रोजी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची स्थिती जाहीर करण्यात येईल.
शाखानिहाय प्रवेश
शाखा कॅप फेरी कोटा प्रवेश एकूण
आर्ट्स ९८७० २१८८ १२,०५८
काॅमर्स ३८,८५५ १२,१०८ ५०,९६३
सायन्स ३१,९८४ ८०१८ ४०,००२
एचसीव्हीसी ७६२ १०६ ८६८