अकरावी सीईटीच्या अर्ज नोंदणीचे संकेतस्थळ तात्पुरते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:05+5:302021-07-22T04:06:05+5:30

तांत्रिक समस्येमुळे निर्णय : लवकर पुन्हा सुरू केले जाणार असल्याची शिक्षण मंडळाची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी ...

Eleventh CET application registration website temporarily closed | अकरावी सीईटीच्या अर्ज नोंदणीचे संकेतस्थळ तात्पुरते बंद

अकरावी सीईटीच्या अर्ज नोंदणीचे संकेतस्थळ तात्पुरते बंद

Next

तांत्रिक समस्येमुळे निर्णय : लवकर पुन्हा सुरू केले जाणार असल्याची शिक्षण मंडळाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी सीईटी अर्जनोंदणीच्या संकेतस्थळावर पहिल्याच दिवशी अनेक तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थी आणि पालकांना अर्ज भरताना करावा लागला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळी शिक्षण मंडळाकडून हे संकेतस्थळच बंद करण्यात आले. तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळ बंद करण्यात आले असून, त्यात दुरुस्ती करून लवकरच ते पुन्हा खुले करण्यात येईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी संकेतस्थळ बंद करेपर्यंत राज्यातील १ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली. अकरावी प्रवेशासाठी यंदा घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता सुरू झालेल्या अर्ज नोंदणीत विद्यार्थी, पालकांना सतत अडचणी येत होत्या. बऱ्याचवेळा संकेतस्थळ बंद पडण्याचे प्रकारही घडले. दरम्यान, सायंकाळी ८.३०पर्यंत जवळपास १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी व पालकांना पुन्हा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर अखेर बुधवारी सायंकाळी ६.३०च्या दरम्यान राज्य शिक्षण मंडळाकडून तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ बंद करण्यात येत असल्याच्या सूचना देण्यात आल्या.

शिक्षक - मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी हैराण

अर्ज नोंदणीत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थी, पालक सतत शिक्षक आणि मुख्याध्यापकांना फोन करत आहेत. मात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना राज्य मंडळाकडून अर्ज भरण्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनाही अनेक प्रश्नांबद्दल माहिती नसल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी सांगितले. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने अर्ज नोंदणीसाठीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आली आहे.

तांत्रिक अडचणींचा आढावा घेऊन संकेतस्थळ लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येईल.

- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Web Title: Eleventh CET application registration website temporarily closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.