अकरावी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:39+5:302021-07-18T04:06:39+5:30
विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - यंदा दहावीच्या परीक्षेत अगदी १०० टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळणार ...
विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - यंदा दहावीच्या परीक्षेत अगदी १०० टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळणार नाही. या प्रवेशासाठी त्यांना यंदा सीईटी परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांना राज्य शिक्षण मंडळाकडून सीईटीचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सीईटीचे वेळापत्रक आणि अर्ज नोंदणी केव्हा सुरू होईल, याचा तपशील सोमवारी राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागला आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे लाखो विद्यार्थी राज्यात आहेत तर मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारांवर आहे; मात्र यंदाच्या अकरावी प्रवेशात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत, त्यांना त्यांच्या सीईटीच्या गुणांकनानुसार अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे दहावीच्या निकाल पार पडला असला तरी विद्यार्थ्यांना आता सीईटी परीक्षेच्या दिव्यातून पार पडावे लागणार आहे. साहजिकच इथे त्यांना सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांशी नामांकित महाविद्यालयासाठी स्पर्धा करावी लागणार आहे.
दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार करता इंग्रजी भाषेचा पर्याय असेल तर मराठीचाही पर्याय विद्यार्थ्यांना असावा, अशी मागणी मराठी शाळा संघटना, मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी असताना त्यांना मराठी विषय वगळता हे चार विषय त्यांच्यावर थोपवले जात असतील तर या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अन्यायकारक व मराठी भाषेला दुय्यम स्थान देणारा असणार आहे. या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर होण्यासाठी मराठी विषयाला स्थान द्यावे किंवा हवे तर मराठीसह हे विषय ऐच्छिक ठेवा. ज्यांना ज्या विषयातून परीक्षा द्यायची ते विषय विद्यार्थी निवडतील, अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनात केली आहे.